maharashtra

सातारा पालिकेकडून शंभर फ्लेक्स जप्त

आठ जणांना दहा हजार दंडाची नोटीस

फुकट फ्लेक्सबाजी करणाऱ्यांना सातारा पालिकेने आज कठोर चाप लावला. अतिक्रमण हटाव विभागाने शहरात धडक कारवाई करत तब्बल शंभर फ्लेक्स जप्त केले.

सातारा : फुकट फ्लेक्सबाजी करणाऱ्यांना सातारा पालिकेने आज कठोर चाप लावला. अतिक्रमण हटाव विभागाने शहरात धडक कारवाई करत तब्बल शंभर फ्लेक्स जप्त केले. आठ जणांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. ही फ्लेक्स हटाव मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी सांगितले.
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले शंभरहून अधिक अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त केले. तसेच आठ जणांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली असून, प्रशासकीय सभेत झालेल्या ठरावाप्रमाणे संबंधितांकडून प्रत्येक दहा हजार रुपये सेवा शुल्क वसूल केले जाणार आहे.
सातारा शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डचा विषय नेहमीच चर्चेचा ठरतो. वारंवार कारवाईचा बडगा उगारला अथवा फ्लेक्स बोर्ड जप्त केले तरी पालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. अशा फुकट्या जाहिरातदारांवर अंकुश लावण्यासाठी पालिका प्रशासनाने नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सभेत फ्लेक्स बोर्ड जप्त करण्याबरोबरच संबंधितांकडून दहा हजार रुपये सेवा शुल्क वसूल करण्याचा ठराव मंजुर केला. दरम्यान, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिलेल्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागप्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने गुरुवारी जिल्हा रुग्णालय, वायसी कॉलेज, गोडोली चौक, शाहूनगर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक या ठिकाणाहून शंभरहून अधिक फ्लेक्स जप्त केले.
फ्लेक्स लावणाऱ्या आठ जणांना अतिक्रमण विभागाने नोटीस बजावली असून, संबंधितांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये सेवा शुल्क वसूल केले जाणार आहे. शहरात शुक्रवारी देखील अनधिकृत फ्लेक्स जप्त करण्याची मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती प्रशांत निकम यांनी दिली.