कटगुण (ता. खटाव) येथील किशोर प्रल्हादराव विधाते यांच्या फार्महाऊसवर त्यांची आई श्रीमती सुमन प्रल्हादराव विधाते यांचा खून करणाऱ्या मध्यप्रदेशातील सुनीलकुमार गणपत गौड (वय ३०) याला वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पुसेगाव : कटगुण (ता. खटाव) येथील किशोर प्रल्हादराव विधाते यांच्या फार्महाऊसवर त्यांची आई श्रीमती सुमन प्रल्हादराव विधाते यांचा खून करणाऱ्या मध्यप्रदेशातील सुनीलकुमार गणपत गौड (वय ३०) याला वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, पुसेगाव येथील किशोर प्रल्हादराव विधाते यांचे कटगुण येथे फार्महाऊस आहे. त्यांनी शेतगडी म्हणून कामास ठेवलेल्या छोटी इसीपूर (मध्यप्रदेश) येथील सुनीलकुमार गौड याने ८ नोव्हेंबर २०१४ रोजी विधाते यांची आई श्रीमती सुमन विधाते यांचा चोरीच्या उद्देशाने कुऱ्हाडीने वार करुन खून केला होता. याबाबतचा खुनाचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. तत्कालीन सपोनि. आर. एस. सावंत्रे यांनी सदर गुन्ह्याचा तपास तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करुन आरोपपत्र दाखल केले होते. सध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, सपोनि संदीप शितोळे यांनी यांनी मार्गदर्शन केले. न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजित कदम - साबळे यांनी काम पाहिले. यामध्ये १४ साक्षीदार तपासण्यात आले. कागदोपत्री तसेच वैद्यकीय पुरावा, साक्षीदारांचे जबाब, सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवून भा. दं. वि. सं. कलम ३०२ प्रमाणे जन्मठेप व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. कलम ३८१ प्रमाणे ३ वर्षे कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या कामी सरकारी वकीलांना सहाय्यक फौजदार दत्तात्रेय जाधव, पो. कॉ. अश्विनी घाडगे, विजयालक्ष्मी दडस, अक्षय शिंदे, सागर सजगणे यांनी सहकार्य केले.


