स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा येथील रोहन बाळासाहेब वाघमारे (रा. आझादनगर, शाहूपुरी) या युवकावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या तपासाकामी त्याला पोलिसांनी बोलविले असता प्रकरण अंगलट येतंय म्हणून त्याने त्या ठिकाणावरुन पोबारा केला. या सर्व भानगडीमध्ये त्याने पोलीस फौजदारालाच गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला. एक भानगड जिरवण्यासाठी वाघमारेने दुसरी भानगड केली.
सातारा : स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा येथील रोहन बाळासाहेब वाघमारे (रा. आझादनगर, शाहूपुरी) या युवकावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या तपासाकामी त्याला पोलिसांनी बोलविले असता प्रकरण अंगलट येतंय म्हणून त्याने त्या ठिकाणावरुन पोबारा केला. या सर्व भानगडीमध्ये त्याने पोलीस फौजदारालाच गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला. एक भानगड जिरवण्यासाठी वाघमारेने दुसरी भानगड केली. पोलिसांनीही लागलीच सरकारी कामात अडथळा, जिवे मारण्याचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल करुन त्याची नाकेबंदी केली. पण वाघमारेही कच्च्या गुरुचा चेला नाही. पोलीस अधिकार्यांच्या बरोबर राहिल्यामुळे पोलिसांना कसे चकवायचे, याचे कसब अंगी असल्याने वाघमारे गुन्हा दाखल होवून आठवडा झाला तरी पोलिसांना अद्याप सापडला नाही.
सातार्यात दोन महाराज व कंदी पेढ्याशिवाय विशेष असं काहीच नाही, असे गंमतीने मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु, व्याख्याते, विद्यावाचस्पती दिवंगत प्रा. शिवाजीराव भोसले नेहमी म्हणायचे. स्वराज्याची तिसरी राजधानी असूनही सातारा शहराचा कोल्हापूर व पुण्याच्या तुलनेत म्हणावा असा विकास झाला नाही. तो का झाला नाही, का केला नाही, हा संशोधनाचा विषय असला तरी त्यांनी उल्लेख केलेल्या तीन जिनसांपैकी काही विशेष नाही. परंतू सातार्यातील काही नग कधी, काय करतील याचा नेम नसतो. रोहन वाघमारे या युवकाचे अनेक कारनामे यापूर्वी उघड झाले. पण पोलीस दलातील बड्या अधिकार्यांनी ते कारनामे बाहेर येवू दिले नाहीत. त्याला मदत करणारे पोलीस अधिकारी बदलून गेलेल्या ठिकाणी केलेल्या भानगडींमुळे अडचणीत आलेत. अगदी त्यांची पोलीस दलातून गच्छंतीही झालेली आहे. वाघमारेचा इतिहास जाणून घेण्यासाठी काही वर्षे पाठिमागे जावे लागेल.
भंगाराचा व्यवसाय करणारा रोहन वाघमारे अगदी तिशीतच नसलेल्या मिशांवर ताव मारुन सातार्यातील चौका-चौकातून इम्पोर्टेड गाड्यांमधून फिरु लागला. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने एका पोलीस अधिकार्याच्या मदतीने आपल्या गाडीला पोलीस गाडीचा एक सायरनही बसवला होता. दीड वर्षांपूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाला लॉकडाऊन जाहीर करावा लागला. या लॉकडाऊनमध्ये अनेक रथी-महारथी घरात बसूनच दिवस कंठायचा प्रयत्न करीत असतानाच वाघमारे मात्र सायरन वाजवत बिचार्या पोलिसांच्या नाकावर टिच्चुन शहरात गस्त घालत होता. सामान्य मात्र जिवनावश्यक वस्तू आणावयास गेले तरी त्यांनी आपापल्या पार्श्वभागावर पोलिसांच्या लाठ्या-काठ्या फोडून घेतल्या. मात्र वाघमारे सर्वांनाच अपवाद ठरला. कारण, त्याचे पोलीस दलातील वरिष्ठांपर्यंत असलेल्या संबंधांमुळेच.
सातारा हे धड ना शहर, ना खेडे. राजवाड्यावर शिंकला तरी त्याचा आवाज पोवई नाक्यावर येतो. त्यामुळे रोहन वाघमारेच्या अगोदरही अनेक महानुभवांनी जिवाचा सातारा करुन घेतल्याच्या अनेक घटना यापूर्वी सातार्यात घडलेल्या आहेत. त्यावर ‘उपर्यांच्या करामती’ नावाचे पुस्तकही होवू शकते. काही वर्षांपूर्वीच निखील जोशी उर्फ भाई, उर्फ परेश आंबुर्ले नावाच्या ठकाने अचानकच सातारा शहरात एन्ट्री घेतली. इम्पोर्टेड गाड्या, उंची दारु आणि अत्तरे आणि दिमतीला दोन-चार मुष्ठंडे युवक. त्यामुळे निखील भाई ने अल्पावधीतच शहरातील युवकांची मने जिंकायला सुरुवात केली. घरात चपातीला डालडा लावून खाणारे निखील जोशीच्या संपर्कात आल्यानंतर ब्रेड-बटर खायला लागले. नव्याने उदयास आलेली मानस, मराठा तसेच महिंद्रा सारखी हॉटेलही भाईच्या आदरातिथ्यामुळे फुलू लागली. तालमी आणि जिम मध्ये घाम गाळणारे अनेक पंटर निखील भाईच्या पाठिपुढे करुन वर्जिश करु लागले. कोण म्हणे, तो अंडरवर्ल्डचा डॉन आहे, तर कोण म्हणे हिर्याचा व्यापारी. पण शेवटपर्यंत निखील भाई कोण-कुठला, याचा थांगपत्ताही लागला नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी अखेर त्या निखील भाईचाही फुगा फुटला. केरळ पोलिसांनी सातार्यातील फर्न या तारांकित हॉटेलमध्ये डोक्याला पिस्टल लावून निखील जोशीला ताब्यात घेतले. त्याच्याबरोबर असणारे दोन-चार पंटरही पोलिसांनी घोळात घेतले.
एव्हाना सातार्यात निखील भाईला अटक, अशी बातमी पसरताच अनेक युवकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. आता यापुढे आपला तर नंबर नाही ना? अशा शक्यता सातार्यातील चौका-चौकामध्ये वर्तवू जावू लागल्या. पण ते केरळ पोलीस आहेत, मेरिटवर तपास करतात. महाराष्ट्र पोलिसांसारखे ते निर्दोषांना नाडत नाहीत, तर एव्हाना निखील जोशी उर्फ भाई उर्फ परेश आंबुर्ले हे खरे नाव तर गाव नाशिक नसून कोकणातील चिपळून शेजारचे आंबळस. किशोर वयातच मर्डर केल्याने तो गावातून फरार असल्याचे माहितगाराने सांगितले. परेश आंबुर्लेने केरळात एका ठिकाणी टाकलेल्या दरोड्यामुळे त्याला अटक करण्यात आली. चोरीचे सोने विकत घेतल्यामुळे सातार्यातील एका डॉक्टरसह अनेक नामचीनही केरळ पोलिसांच्या रडारावर आले. अटक झाली, जामीन झाले. आता तेच पुन्हा सातार्यात येवून उजळमाथ्याने फिरत आहेत. निखील जोशी उर्फ परेश आंबुर्ले असून किंवा बँकांना टोप्या लावून सातार्यातील रस्त्यावर जग्वार घेवून फिरणारा सदरबझार मधील महंमद शेख असो. त्यांचाच शागिर्द रोहन वाघमारे निघाला. या दोघांची मोडस ओपरेंडी वापरुन रोहनने एक भंगारवाला ते बिल्डर, हॉटेलियर असे वेगवेगळे रोल निभावून राजाबाबू होण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हॉटेल निराळी मध्ये बसून पोलीस अधिकार्यांच्या आशिर्वादाने रोहनने सातारा शहरात निरनिराळ्या भानगडी केलेल्या आहेत. एसबीआय या बँकेची फसवणूक केल्यानंतर रोहन वाघमारे हा सातारा पोलिसांच्या पुन्हा रडारावर आलेला आहे. त्याच्या सुरु असलेल्या गृहप्रकल्पामध्ये बुकिंग करुन अनेकांकडून कोट्यवधींच्या घरातल्या अनामत रकमाही उचलेल्या आहेत. तशा तक्रारीही आता पोलीस ठाण्यापर्यंत येवू लागलेल्या आहेत. शाहूपुरीच्या राजकारणातील किंगमेकर संजय पाटीलचा पठ्ठा असणार्या रोहन वाघमारेने पाटलांनाच आस्मान दाखवून जलमंदिरात आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत सातारा पोलीस एस्कोर्ट सुविधा हे मंत्र्यांसाठी तसेच व्हीव्हीआयपी लोकांसाठी द्यायचे. परंतू सातार्यातील बड्या पोलीस अधिकार्यांना पुण्यातून फिमेल एस्कॉर्ट पुरविण्याचे काम हे वाघमारेनेच सुरु केले असल्याची चर्चा सध्या सातार्यात ऐकिवात आहेत. असो, हा ज्याचा-त्याचा पर्सनल मॅटर आहे. निखील भाई उर्फ परेश आंबुर्ले, महंमद शेख किंवा रोहन वाघमारे सारख्या लोकांनी अनेकांना टोप्या घालून सातार्यातील तरुणवर्ग नासवण्याचे काम केले आहे. गुंडपुंड परवडले. त्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस यंत्रणा अस्तित्वात आहे. परंतू चांगले करियर करणार्या, उच्च शिक्षण घेणार्या राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांची तयारी करणार्या अनेक चांगल्या तरुणांना या ठकांनी कामाला लावण्याचे पाप केले आहे, त्यांना बरबाद करण्याचे काम केले आहे. एक कांदा पोत्यातील सर्व कांदे नासवतो. त्यामुळे सातार्यासारख्या विकसनशील शहराला असले ठग परवडणारे नाहीत. 1 वाघमारे, 5 पिणारे व दहा खाणार्यांमुळे सातारा शहराचा समतोल बिघडला जातोय. शेवटी खायला व प्यायला असणारा कांड घडल्यास वाचवायला येत नाही, हे केरळ पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर सातारकरांच्या लक्षात आले आहे. परंतू कळतंय पण वळत नाही, अशा मानसिकतेत असलेल्या लोकांना आता खर्या अर्थाने विचार करण्याची वेळ आलेली आहे.
अटक केव्हाही करा, पहिला सायरन जप्त करा!
भंगाराच्या व्यवसायातून हरिओम करणार्या रोहन वाघमारे हा नंतरच्या काळात टोपी माष्टर झाला. ढवळ्या शेजारी पवळा बांधला की वाण नाही तर गुण लागतोच. याप्रमाणे अनेक पोलीस अधिकार्यांच्या संगतीला राहून, त्यांना खुश करुन रोहन वाघमारेने बँकांसह वेगवेगळ्या आस्थापनांना टोप्या घालून बक्कळ पैसा कमवला. पोलीस अधिकारी होता नाही आले, पण त्याने पोलीस अधिकार्यांना गळ घालून त्याच्या मालकीच्या मर्सिडीज बेंझ तसेच ह्युंदाई वरना या गाड्यांना मात्र पोलिसांच्या गाडीचे सायरन लावून घेतले. करंजे पेठ, बसस्थानक परिसर व शाहूपुरीमध्ये वाघमारेने ऐन लॉकडाऊनमध्ये गाडीच्या सायरनचा भोंगा वाजवून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. अशांना हा पोलीस नसून वाघमारेचं कार्टं आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. परंतू हाच वाघमारे पोलिसांच्या कात्रीत सापडल्यानंतर त्याला अटक केव्हाही करा, पण पहिला त्याच्या गाडीचा सायरन जप्त करा, अशी मागणी अनेकांनी केली आहे.


