मतदार याद्या आणि वोटर्स सर्च वेबसाईट मधील त्रुटी दुरुस्त कराव्यात
भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांची मागणी
वोटर्स सर्च वेबसाईट दुरुस्त करून नागरिकांमधील संभ्रमावस्था कमी करावी, अशी लेखी मागणी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्याकडून करण्यात आली.
सातारा : वोटर्स सर्च वेबसाईट दुरुस्त करून नागरिकांमधील संभ्रमावस्था कमी करावी, अशी लेखी मागणी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्याकडून करण्यात आली.
इलेक्शन कमिशन कडून दि. 27 ऑक्टोबर रोजी नवीन मतदार याद्या प्रसिद्ध केल्या गेल्या. या याद्या सर्वच राजकीय पक्षांना देण्यात आल्या होत्या. त्यांचा अभ्यास करताना सदरच्या याद्या आणि इलेक्शन कमिशनची अधिकृत वेबसाईट वोटर्स सर्च यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे, वोटर सर्च वेबसाईट वरून बूथ नंबर शोधताना त्या ठिकाणी अजूनही जुनाच बूथ नंबर येत आहे. वास्तविक पाहता ज्यावेळी नवीन मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या, त्याच वेळी वेबसाईटसुद्धा दुरुस्त होणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले दिसत नाही. याबाबतची माहिती पुराव्यासहित भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा भगवान कांबळे यांना दाखवली. शासनाकडून नवीन मतदार नोंदणीसाठी व्यापक मोहीम राबवली जात आहे. त्यावेळी सुद्धा वोटर्स सर्च वेबसाईट वरून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. त्या ठिकाणी नोंदणी करून जर बूथ नंबर घेतला तर नंतर मिळणाऱ्या मतदार यादी मध्ये वेगळाच बूथ नंबर येऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून, वोटर्स सर्च वेबसाईट लगेच अपडेट करून घ्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा भगवान कांबळे यांनी सदरच्या वेबसाईट मध्ये काही वेळा दुरुस्ती उशिरा होते हे मान्य करून, त्यामध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्वांनी प्ले स्टोअर मधून voter helpline हे अँप डाउनलोड करून त्यावरून मतदार बूथ शोधणे, मतदार नंबर शोधणे, नवीन नोंदणी करणे आणि या संबंधीची सर्व कामे करण्याचे आवाहन केले.
या वेळी भा ज पा जिल्हासरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, बूथ सदस्य जितेंद्र लिंबकर उपस्थित होते.


