maharashtra

राज्यातील सत्तांतर ही लोकशाहीतील लाजिरवाणी घटना : तुषार गांधी


मतांचा सर्वात मोठा सौदा होऊन विश्वासघात होत असताना सर्व जनता गप्प राहिली. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी जनतेच्या मतांचा सौदा करणे हा राज्यकर्त्यांचा अधिकार असल्याची प्रथा आपण प्रस्थापित केली आहे. याची प्रत्येक नागरिकाला लाज वाटली पाहिजे, असे स्पष्ट मत महात्मा गांधींचे पणतू, लेखक, सामाजिक कार्यकर्ते व गांधी विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

पुसेगाव : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जनतेच्या मतांचा झालेला व्यापार आणि अपमान ही लोकशाहीतील लाजिरवाणी घटना आहे. मतांचा सर्वात मोठा सौदा होऊन विश्वासघात होत असताना सर्व जनता गप्प राहिली. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी जनतेच्या मतांचा सौदा करणे हा राज्यकर्त्यांचा अधिकार असल्याची प्रथा आपण प्रस्थापित केली आहे. याची प्रत्येक नागरिकाला लाज वाटली पाहिजे, असे स्पष्ट मत महात्मा गांधींचे पणतू, लेखक, सामाजिक कार्यकर्ते व गांधी विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
पुसेगाव येथे प. पू. श्री हनुमानगिरी महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘७५ वर्षानंतर भारत गांधींच्या स्वप्नातील आहे का?’ या विषयावर ‘श्री सेवागिरी व्याख्यानमालेत’ पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष संतोष (बाळासाहेब) जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, श्रीधर साळुंखे, राजेंद्र शेलार, ट्रस्टचे आजी-माजी विश्वस्त, सरपंच विजय मसणे आदी उपस्थित होते.
गांधी म्हणाले, आज जनता राजकारण्यांची मनमानी निमूटपणे सहन करत असल्याने देशात लोकशाही धोक्यात आली आहे. आपण लोकशाहीत जगतो याचा आपल्याला अभिमान आहे. मात्र, देशात एखादा कायदा तयार करत असताना आपले मत विचारात देखील घेतले जात नाही. ही बाब गंभीर आहे. ९० वर्षांपूर्वी मिठावर कर लावला गेला होता. त्यावेळेस सत्याग्रह झाला होता. महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली होती. आज स्मशानघरात सुद्धा कर लागतो. तरी आपण मूग गिळून गप्प राहतो. ही शोकांतिका आहे. जगा नाहीतर मरा, मात्र सरकारला कर भरा अशी आज आपली अवस्था झाली आहे. आपल्या मताला किंमत द्यायला राजकारणी तयार नाहीत. त्यामुळे ७५ वर्षानंतर भारत गांधींच्या स्वप्नातील आहे का? असा प्रश्न विचारला गेला तर याचे उत्तर नाही असेच असेल.  
आज देशात नागरिकांना आपला हक्क प्राप्त करण्यासाठी लोकप्रनिधींची खुशामत करावी लागते. जे अधिकार सहजतेने मिळायला हवेत असे अधिकार सुद्धा नागरीकांना शिफारशी घेऊन प्राप्त करावे लागतात. बहुतांश लोकप्रतिनिधी आपले कर्तव्य निभावत असताना जनतेवर उपकार करत असल्याचा आव आणत आहेत. लोकशाहीत नोकरच मालक झाले आहेत. देशाच्या हितासाठी हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे.
आजच्या पिढीची अवस्था गांधीजींच्या तीन माकडांसारखी झाली आहे. वाईट घडत असताना डोळे बंद करतात. मदतीची आर्त हाक ऐकून कान बंद करतात. न्याय हक्कासाठी बोलण्याची वेळ आली की तोंड बंद करतात. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. आपल्याला स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिकांच्या साहस आणि बलिदानाने मिळाले आहे. आपल्याला त्याचा मान राखता आला पाहिजे.
समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते. बापूंना अपेक्षित असलेले समाजाच्या शेवटच्या घटकाच्या जीवनातील परिवर्तन घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे अपेक्षित आहे, असे आवाहन तुषार गांधी यांनी यावेळी केले.
दरम्यान, खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऑडियो मेसेजच्या माध्यमातून व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष (बाळासाहेब) जाधव, सुत्रसंचलन मोहनराव गुरव तर आभार संतोष वाघ यांनी मानले.