maharashtra

उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीचा जादूटोणा : चंद्रशेखर बावनकुळे

पवारांच्या ताब्यातील सहसा कोणी सुटत नाही : भाजप प्रदेशाध्यक्षांचा साताऱ्यातील पत्रकार परिषदेत जोरदार टोला

ठाकरे हे बोल घेवडे आहेत, त्यांच्यावर कोणी जादू केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पवारांच्या जो नादाला लागतो तो सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा जोरदार टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

सातारा : शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अंकित झाले आहेत. सत्ता गेली त्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ आहेत. सत्तेतून ज्यांनी पैसा कमावला ते घाबरले आहे. आमचे सरकार काम करत नाही असं तर ते म्हणत असेल तर त्यांनी कोर्टाकडून ऑर्डर आणावी आणि तसे पुरावे सादर करावेत. ठाकरे हे बोल घेवडे आहेत, त्यांच्यावर कोणी जादू केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पवारांच्या जो नादाला लागतो तो सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा जोरदार टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
 सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी केली. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष, आ. जयकुमार गोरे, आ, शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस विक्रम पावस्कर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल भोसले, मनोज घोरपडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 200 हून अधिक आमदार आणि 45 हून अधिक खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असून महाराष्ट्रात तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष कसा होईल या दृष्टीने संघटनात्मक बांधणी सुरू आहे. या बांधणीचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातूनच मी 24 जिल्ह्यांचा दौरा पूर्ण केला असून येत्या दहा डिसेंबर पर्यंत हा दौरा पूर्ण होणार आहे . या संघटनात्मक बांधणीमध्ये कार्यकारणी सदस्य प्रमुखापासून ते शक्ती संघटन केंद्र ते बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने ज्या ज्या योजना राबवल्या त्या-त्या योजनांची माहिती आणि त्याचा प्रसार प्रचार केला जाणार आहे. राज्यातील दोन कोटी लोक धन्यवाद मोदीजी असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिणार आहेत. गरीब कल्याण योजनेचा देशातील पाच कोटी 63 लाख नागरिकांना आत्तापर्यंत लाभ झाला आहे.
प्रतापगडच्या पायथ्याशी असणारे अफजलखान कबर परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले त्या संदर्भात बावनकुळे यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच यासंदर्भात संघटनात्मक लढा देणाऱ्या सर्व संघटनांचा त्यांनी आदरपूर्वक उल्लेख करून त्यांना धन्यवाद दिले. शिंदे सरकारने जो धडाकेबाज निर्णय घेतला त्याबद्दलही त्यांचे कौतुक करत त्यांना आभार मानले. मताच्या लांगुलचालनासाठी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने अफजल खान कबरीचा प्रश्न जाणीवपूर्वक सोडवला नाही मात्र शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवले या शब्दात त्यांनी सध्याच्या सरकारचे कौतुक केले.
ठाकरे सरकार  निर्णय घेण्यात कुचकामी ठरले आहे. अडीच वर्षाच्या कालखंडात सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे महाविकास आघाडीच्या सरकारने दुर्लक्ष केले. त्यांचे मंत्री झेंडा टू झेंडा ठराविक कार्यक्रमाला उपस्थित राहून लोकांशी संवाद साधण्यात कमी पडले. उद्धव ठाकरे आमच्या शासनावर टीका करत आहेत. या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, जर त्यांच्याकडे अडीच वर्षे सत्ता होती, यंत्रणा त्यांची होती तर मग त्यांनी आमच्या दोषी कार्यकर्त्यांवर कारवाई का केली नाही. मुळात उद्धव ठाकरेच कधी मंत्रालयात गेले नाहीत. ठाकरे सरकार हे सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झाले असून त्यांची सतत काही ना काही त्यामुळे बडबड सुरू असते. आमचे सरकार असल्या कोणत्याही गोष्टीला भीक घालत नाही ठाकर यांनी एक करावं. त्यांच्या जर दम असेल तर त्यांनी आमच्या सरकारला अडून दाखवावे. जर आमच्या सरकारमध्ये त्रुटी असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन पुरावे सादर करावे आणि मनाई हुकूम आणावा.
बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडण्याची आमची जोरदार तयारी आहे. निर्मला सीतारमण यांच्यानंतर बारामतीमध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी सातत्याने भाजपची संवाद रणनीती सुरू आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा विकास केला असला तरी तो शहराचा विकास आहे. बारामती मतदारसंघाचा नाही बऱ्याचशा भागांमध्ये सुप्रिया सुळे यांनी गेल्या आठ वर्षात संवाद देखील साधलेला नाही. हे आम्हाला गेल्या तीन महिन्याच्या दौऱ्यामध्ये लक्षात आले आहे. अजित दादा पुन्हा नॉट रिचेबल असून ते भाजपच्या संपर्कात आहेत काय असा प्रश्न बावनकुळे यांना विचारला असता ते म्हणाले, अजितदादा नेमके काय करतील हे मी काय सांगू शकत नाही. कारण त्यांच्या मनात काय चालले आहे हे कोणालाच माहीत नसते. ते काहीही करू शकतात असा राजकीय टोला बावनकुळे यांनी लगावला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून संघटनात्मक रचना भाजपने मजबूत करण्याची जोरदार प्रयत्न चालवले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवार सुद्धा मिळणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे, तो जादूटोणा करणारा कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. पवारांच्या ताब्यात आलेला सहजासहजी सुटत नाही. राष्ट्रवादीने जादूटोणा केल्यामुळेच चुकीच्या मार्गाला जाऊन अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले. सध्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, इतिहासात ची कुणी छेडछाड करू नये सेंसर बोर्डाने लक्ष देऊन चित्रपटाचे अभ्यासपूर्वक परीक्षण करावे आणि मग त्याला मंजुरी द्यावी सातारा पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप पक्ष कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. दोन्ही आघाड्या विशेषता खा. उदयनराजे भोसले गट व आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा गट हा कमळ चिन्हावर विश्वास लढवेल. पक्ष कार्यकारिणीच्या करण्याच्या माध्यमातून परिस्थिती सापेक्ष योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.