मोक्कांतर्गंत कारवाईतील फरारी कुख्यात गुन्हेगारास अटक
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची पुण्यात कारवाई
दोन वर्षांपूर्वी सातारा एमआयडीसीनजिक असलेल्या धनगरवाडी येथे एकाचे अपहरण करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर मोक्काची कारवाई झाल्यापासून फरारी असलेल्या सनी लक्ष्मण अडसूळ (वय 21 रा. प्रतापसिंहनगर, सातारा) या आरोपीस सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली आहे.
सातारा : दोन वर्षांपूर्वी सातारा एमआयडीसीनजिक असलेल्या धनगरवाडी येथे एकाचे अपहरण करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर मोक्काची कारवाई झाल्यापासून फरारी असलेल्या सनी लक्ष्मण अडसूळ (वय 21 रा. प्रतापसिंहनगर, सातारा) या आरोपीस सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली आहे. पुण्यात कोंडवा परिसरात पाठलाग करुन त्याला जेरबंद केले असून या कामगिरीबद्दल डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 फेब्रुवारी 2019 रोजी धनगरवाडी, ता. सातारा येथील एकाचे अपहरण करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (रा. प्रतापसिंहनगर, खेड) याच्या टोळीने हे कृत्य केले होते. त्यावेळी या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गंत कारवार्इ करण्यात आली होती. मात्र, या टोळीतील या गुन्ह्यात सहभागी असलेला सनी लक्ष्मण अडसूळ हा दोन वर्षांपासून फरारी झाला होता. तो मिळून येत नसल्याने त्याला पकडण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रयत्न करत होते.
दि. 14 रोजी सनी अडसूळ पुण्यातील कोंडवा परिसरात असल्याची खबर मिळाल्यानंतर डीबीचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी कोंडवा याठिकाणाहून त्यास अत्यंत शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले. या कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पो.ना.सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, अभय साबळे, पो.कॉ.संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.


