जुन्या वादातून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना फलटण, ता. फलटण येथे घडली आहे.
सातारा : जुन्या वादातून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना फलटण, ता. फलटण येथे घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अंकुश लालासो चव्हाण (रा. ठाकुरकी, फलटण) यांचा फलटणमध्येच राहणार्या रवी पाटोळे यांच्याशी जुना वाद होता. दि. 12 ऑगस्ट रोजी अंकुश चव्हाण हे त्यांची पत्नी संचिता अंकुश चव्हाण यांच्यासमवेत दुचाकीवरुन (क्र. एमएच 11 बीएफ 6396) पद्मावती नगरकडे निघाले होते. यावेळी रवी पाटोळे हा आपल्यासमवेत अजय मदने, विजय मदने आणि एका अनोळखी इसमाला बरोबर घेवून पिकअप गाडीतून (क्र. एमएच 11 एजी 9561) विरुद्ध बाजूकडून आला. पाटोळे याने जुना राग मनात धरुन पूर्ण रॉंग साईडला गाडी घेवून चव्हाण यांच्या गाडीला धडकवली. एवढ्यावरच न थांबता पाटोळे याने व त्याच्या वरील अन्य साथीदारांनी अंकुश चव्हाण याला मारहाण केली. ही मारहाण एवढी जबर होती की चव्हाण हे रक्तबंबाळ झाले. यानंतर चव्हाण यांनी तडक फलटण पोलीस ठाणे गाठले असता पोलिसांनी या घटनेची कोणतीही दखल घेतली नाही. यानंतर चव्हाण हे फलटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. सरतेशेवटी चव्हाण हे जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या रवी पाटोळे व त्याच्या अन्य साथीदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.


