भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीकारक महापुरुषाला जन्म देणाऱ्या महामाता भीमाबाई यांच्या नावाचा पुरस्कार ज्ञान दिव्याला ऊर्जा देणारा व माझ्या उर्वरित कार्याला प्रेरणाबळ देणारा आहे, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सामाजिक कार्यकर्त्या, माणदेशी फौंडेशन व माणदेशी महिला सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी व्यक्त केले.
सातारा : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीकारक महापुरुषाला जन्म देणाऱ्या महामाता भीमाबाई यांच्या नावाचा पुरस्कार ज्ञान दिव्याला ऊर्जा देणारा व माझ्या उर्वरित कार्याला प्रेरणाबळ देणारा आहे, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सामाजिक कार्यकर्त्या, माणदेशी फौंडेशन व माणदेशी महिला सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने चेतना सिन्हा यांना ग्रामीण दुष्काळ भागातील वंचित महिलांचा विकास आणि मायक्रो फायनान्स मधील मौलिक योगदाना बद्दल तेविसावा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्या प्रसंगी सिन्हा बोलत होत्या.
यावेळी विचार मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह ऍड. हौसेराव धुमाळ, विश्वस्त प्राचार्य डॉ.संजय कांबळे व डॉ. सुवर्णा यादव उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली समतेच्या हक्कासाठी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला. त्यास ९५ वर्षे झाली. या घटनेच्या पुर्वसंध्येला पार पडलेल्या या सोहळ्यात चेतना सिन्हा यांनी भावस्पर्शी भाषणात आपला क्रांतीकारी जीवनपट उलगडून दाखवला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील तुरुंगवास आणि जयप्रकाश नारायण यांच्या संपुर्ण क्रांतीच्या आंदोलनाने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली असे सांगून त्या म्हणाल्या, ऊषा मेहता,दलित पँथरचे नेते अरुण कांबळे यांचे मार्गदर्शनामुळे सामाजिक चळवळीत योग्य दिशा मिळाली. छात्र युवा संघर्ष वाहिनीत काम करताना म्हसवडचे कार्यकर्ते विजय सिन्हा यांची भेट झाली. नामांतर आंदोलनात आम्ही दोघांनीही तुरुंगवास भोगला. चळवळीतील सहवासानंतर विजय जीवनसाथी झाला व मी त्याच्या ग्रामीण दुष्काळ प्रवण माण तालुक्यातील म्हसवडमध्ये स्थायिक झाले व वंचित महिलांच्या चिरंजीवी शाश्वत विकासाला वाहून घेतले. तुरुंगात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा वाचली. त्यामुळे वैज्ञानिक बौद्ध धम्माचे आकलन झाले व बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी होते हेही कळाले. हे माझ्यासाठी फार मोलाचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञान दिव्याला जन्म देणाऱ्या महामाता भीमाईने अखेरचा श्वास सातारच्या भूमीत घेतला. हा फार मोठा वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे. हा प्रेरणादायी ठेवा पुढील पिढी समोर कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. माणदेशीच्या सामान्य वंचित महिलां यशस्वीपणे विविध क्षेत्रात नेतृत्व करु लागल्या आहेत. मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्काराच्या या महिलांच ख-या अर्थाने मानकरी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे डॉ.अशोक भोईटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील सुभेदार रामजी व आई भीमाबाई यांच्या ऐतिहासिक जीवनातील घटनांचे महत्व विषद केले.बाबासाहेब आंबेडकर हे सुभेदार रामजीबाबांचे चौदावे रत्न त्यांचा जन्मही १४ एप्रिलचा.हे एकप्रकारचे वैशिष्ट्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचे काटेकोर पालन केल्यास देशाचे भले होईल. फुले-आंबेडकर यांच्या स्वप्नातील समताधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे.
संबोधी प्रतिष्ठानचे हितचिंतक देणगीदार आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त अधिकारी भास्करराव फाळके व सहकार्यवाह अनिल बनसोडे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
माणदेशी बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखाताई कुलकर्णी, माणदेशी फौंडेशनचे उपाध्यक्ष जवाहर भालचंद्र देशमाने, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्यासह मान्यवरांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक कार्यवाह ऍड. हौसेराव धुमाळ यांनीकेले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.संजय कांबळे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा यादव यांनी केले. रमेश इंजे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच माणदेशी फौंडेशनच्या महिलां, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


