जलजीवन मिशन योजनेत रामराजेंनी फुकाचे श्रेय लाटू नये!
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर : 2024 पर्यंत पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार करणार...
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या योजनेंतर्गत येत असलेल्या कामांबाबत उद्घाटनांचा सपाटा लावला असून आम्ही करीत असलेल्या विकासकामांचे फुकाचे श्रेय लाटण्याचा याद्वारे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सातारा येथे केला.
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक असलेले जलजीवन मिशन 2024 पर्यंत पूर्णत्वास नेणार असून आतापर्यंत सातारा जिल्ह्यात या मिशन अंतर्गत 76.91 टक्के काम पूर्ण झाले असून राष्ट्रवादीचे नेते तसेच विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या योजनेंतर्गत येत असलेल्या कामांबाबत उद्घाटनांचा सपाटा लावला असून आम्ही करीत असलेल्या विकासकामांचे फुकाचे श्रेय लाटण्याचा याद्वारे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सातारा येथे केला.
केंद्रीय जलजीवन मिशन ची आढावा बैठक काल दि. 16 रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. ही बैठक माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा जलशक्ती मंत्रालय पार्लमेंटरी बोर्ड सदस्य रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व अन्य अधिकार्यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीनंतर खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे स्वप्न आहे, ते स्वप्न म्हणजे हर घर जल. ते स्वप्न लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2024 च्या अगोदरच हे स्वप्न आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पूर्ण राज्यभरात पूर्ण करुन दाखवू. या अंतर्गत राज्य व केंद्र सरकारमधील दुवा म्हणून गोर-गरीबांच्या घरात स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करीत आहोत. या योजनेमधील ज्या काही अडचणी आहेत, त्या समजून घेवून ही योजना तळागाळात पोहचविण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले असल्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. दरम्यान, ही योजना जिल्हाभरात सुरु असताना जिल्ह्यात या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीची काही मंडळी सरसावली आहेत. विशेषत: फलटण तालुक्यात माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही या योजनेच्या उद्घाटनांचा सपाटा लावला असून ज्यांना तहहयात प्रादेशिक योजना पूर्ण करता आल्या नाहीत, परंतू केंद्र शासनाच्या या योजनेत स्वत:चे काही योगदान नसतानाही फुकट या योजनेच्या माध्यमातून ते श्रेय लाटत असल्याचा आरोपही खासदारांनी केला.
कश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत या योजनेंतर्गत कामे सुरु आहेत. देशपातळीवर ही योजना केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे राबविली जात आहे. केंद्र सरकार निधी देत असल्यामुळेच ही योजना पूर्णत्वास आलेली आहे. केंद्रात आणि राज्यातही आता एका विचाराचे सरकार आल्यामुळे या योजनेला गती मिळालेली आहे. मात्र, ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली. मात्र, त्यांच्या या कार्याला कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून झाकोळले जात आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची ही योजना असून आम्ही याद्वारे रात्रंदिवस काम करीत असताना रामराजेंसारखी मंडळी मात्र यामध्ये काही योगदान नसताना जनतेची दिशाभूल करीत असून त्यांनी हे उद्योग बंद करावेत, असे म्हणत खासदारांनी रामराजेंना फटकारले आहे.


