maharashtra

लाउडस्पीकरला परवानगी; मात्र आवाजाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई

शांतता कमिटीच्या झालेल्या बैठकीत सातारा पोलिसांनी केले स्पष्ट

गणेश बाप्पांचे आगमन अवघ्या 14 दिवसांवर आले असताना नियम व अटींवर लाउडस्पीकरला परवानगी दिली जाईल. मात्र आवाजाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे शांतता कमिटीमध्ये सातारा पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या निर्णयावर डॉल्बी चालकांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. दरम्यान, अजून अंतिम बैठक होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने त्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

सातारा : गणेश बाप्पांचे आगमन अवघ्या 14 दिवसांवर आले असताना नियम व अटींवर लाउडस्पीकरला परवानगी दिली जाईल. मात्र आवाजाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे शांतता कमिटीमध्ये सातारा पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या निर्णयावर डॉल्बी चालकांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. दरम्यान, अजून अंतिम बैठक होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने त्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
येथील पोलिस करमणूक केंद्रामध्ये गुरुवारी शांतता कमिटीची बैठक झाली. ही बैठक पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, एमएसईबी चे जितेंद्र माने, सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सातारा शहर पोलिस ठाण्याच्यावतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला गणेशोत्सव मंडाळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी अडचणी मांडल्या. या अडचणी मांडताना पोलिस व स्थानिक प्रशासनाचे उपस्थितांनी वाभाडे काढले. एक खिडकी योजना जाहीर करता पण एक खिडकी कधीच दिसत नाही. डॉल्बी सगळीकडे वाजते मग सातार्‍यातच बंदी का. शहरातील काही रस्त्यांवर खड्डे पडले असून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. एमएसईबी डिपॉझिटची रक्कम घेते मात्र ते परत करत नाहीत. जाहीरात कमानीचा निर्णय पोलिस व पालिका प्रशासनाकडून कधीच वेळेत घेतला जात नाही व ते एकमेकांवर टोलवाटोलवी करतात. डॉल्बीला बंदी नसून त्याच्या डेसीबलला बंदी असताना पोलिसांकडून त्याचा अतिरेक केला जात आहे. शहरात ठिकठिकाणी डंपरद्वारे उघड्यावरुन मुरुम वाहतूक होत असून त्यामुळे चिखल होवून अपघातांची मालिका सुरु आहे. अशा प्रकारे उपस्थित अरबाज शेख, नगरसेवक धनंजय जांभळे, श्रीकांत शेटे, नरेंद्र पाटील, चंद्रकांत मोरे, बंडू घाडगे, हिम्मत मोहिते, गणेश दुबळे, नगरसेवक शेखर मोरे यांनी प्रश्न उपस्थित करुन प्रशासनाला धारेवर धरले.
यावर उत्तर देताना प्रशासनाने असे सांगितले की, यंदा सर्वत्र लाईटची कामे सुरु असून लवकरच ती पूर्ण केली जातील. ज्यांचे डिपॉझिट द्यायचे राहिले आहे त्यांना तात्काळ ती दिली जातील. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तळे यावेळीही केली जाणार आहेत. गौण खनिजाची जी उघड्यावरुन वाहतुक सुरु आहे ती झाकून नेली जातील. मिरवणूक मार्ग ठरलेला असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. यावर्षी मिरवणूकीवर ड्रोन कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. तात्पुरत्या तडीपारी कारवाईची प्रक्रिया सुरु असून गणेशोत्सव काळात ती प्रभावीपणे राबवली जाणार आहे.
दरम्यान, डॉल्बीबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करु नये. लाउडस्पीकरसाठी परवानगी दिली जाणार आहे. पोलिसांकडून अशी माहिती जाहीर करताच डॉल्बी चालकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. मात्र स्पीकरचे डेसीबल तपासले जाईल. डेसीबल मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांपासून डॉल्बी मालकांची वाहने सील करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, ही प्राथमिक बैठक असून पुन्हा एकदा अंतिम बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.