maharashtra

१० डिसेंबर पासून जिल्हा परिषद मैदानावर होणार ज्योतिर्मय महोत्सव 2021


Jyotirmoy Mahotsav 2021 will be held on Zilla Parishad ground from 10th December
शाहूनगरवासियांसाठी १० ते १४ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषदेच्या मैदानावर ज्योतिर्मय महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्योतिर्मय फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांनी दिली.

सातारा : शाहूनगरवासियांसाठी १० ते १४ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषदेच्या मैदानावर ज्योतिर्मय महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्योतिर्मय फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन १० रोजी सायंकाळी ५ वाजता राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, देविदास ताम्हाणे आदी  प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात कोवीशिल्ड व को व्हॅक्सिन अशा दोन्ही प्रतिबंधक लसी उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांना यावेळी मोफत लसीकरण शिबिराचा लाभ घेता येईल.
संयोजिका सौ. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, महिला बचत गटांना स्वत: च्या पायावर उभे करावे. त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी तसेच चोखंदळ सातारकरांना खरेदीची एक संधी मिळावी या उद्देशाने दरवर्षी ज्योतिर्मय फौंडेशनच्यावतीने ज्योतिर्मय महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या प्रसारामुळे गेली दोन वर्षे महोत्सव घेतला नाही. तथापि हे सावट दूर झाल्याने आता  जिल्हा परिषदेच्या मैदानावरती ग्राहकांना खरेदी व मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे.
पाच दिवस चालणा-या या महोत्सवात कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर  आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात सुमारे २०० स्टॉल असून भव्य प्रदर्शन व विक्रीच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी हातभार लागणार आहे. महोत्सवात होम अप्लायन्सेस, अँटोमोबाईल, खाना खजाना याशिवाय मनोरंजन आणि लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शाहूनगरवासिय याचा निश्चित लाभ आणि आनंद घेतील, अशी खात्री महोत्सवाच्या निमंत्रक सौ. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांनी व्यक्त्त केली. महोत्सवात महिला भगिनींसाठी 'होम मिनिस्टर' हा महिलांसाठी खास कार्यक्रम असून विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. या शिवाय मनोरंजनाचे इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.