पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी नजीक असलेल्या दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगत सापडलेल्या 28 वर्षीय युवकाचा मृतदेह अमोल डोंगरे (मूळ रा. बीड जिल्हा) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.
सातारा : पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी नजीक असलेल्या दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगत सापडलेल्या 28 वर्षीय युवकाचा मृतदेह अमोल डोंगरे (मूळ रा. बीड जिल्हा) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. अमोलचा खूनच झाला असून सातारा शहर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण (डीबी) संशयिताचा शोध घेत आहेत. दरम्यान, अमोल डोंगरे बेपत्ता असल्याबाबत सिंहगड, पुणे पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरालगत खिंडवाडीतील दगडाच्या खाणीमध्ये चार दिवसांपूर्वी एका युवकाचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. त्यानंतर नागरिकांनी सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खाणीतील पाण्यातून मृतदेह वर काढला. त्याच्या हातावर राणी असे गोंदलेले होते. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र त्यात अपयश येत होते.
अखेर मंगळवारी रात्री माहिती समोर येत गेली आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पोलिसांनी वेगाने तपास केला. मृताची ओळख पटली असून त्याचे मारेकरी देखील समोर आले आहेत. दरम्यान, लवकरच पोलिस याबाबतची माहिती देणार आहेत.


