maharashtra

होळीनिमित्त श्री गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी


Crowd of devotees for the darshan of Shri Gondwalekar Maharaj on the occasion of Holi
माण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गोंदवले याठिकाणी सध्या कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आज होळी पौर्णिमा व गुरुवार असल्याने मोठ्या प्रमाणात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी दर्शन घेतले. या भाविकांना लापशीचा प्रसाद वाटप करण्यात आला.

माण : माण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गोंदवले याठिकाणी सध्या कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आज होळी पौर्णिमा व गुरुवार असल्याने मोठ्या प्रमाणात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी दर्शन घेतले. या भाविकांना लापशीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्व धार्मिक स्थळांवर निर्बंध घालण्यात आले होते. अनेक धार्मिक स्थळे बंद होती. अशावेळी गोंदवलेकर महाराज ट्रस्टने कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी रुग्णालय खुले केले होते. याचा लाभ अनेकांनी घेतला होता. सध्या प्रादुर्भाव कमी झाला असून श्रद्धावान लोकांसाठी धार्मिक स्थळांना भेटी देणे क्रमप्राप्त झाले आहे.
आज पहाटेपासूनच सुमारे नऊ हजार भाविकांनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांना पुजार्‍यांनी प्रसाद दिला. तसेच भाविकांनीही प्रसादाचे साहित्य व रोख रक्कम देणगीच्या स्वरुपात दिली. सध्या भाविकांची गर्दी वाढत असल्याने येथील सुमारे दोनशे व्यवसायिकांना चांगला व्यवसाय मिळत असून महाराजांचीच कृपा त्यांच्यावर असल्याचे सिद्ध झाल्याचे मत तेथील व्यवसायिक रणजित पवार, संदीप नवले, धनाजी वसव यांनी व्यक्त केले.
दर गुरुवारी याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक श्रद्धेने भेट देत असतात. मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान याठिकाणाहून भाविक येत असतात. सध्या रस्त्याचे काम सुरळीत झाले असले तरी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्यामुळे उन्हाचा रखरखीत प्रवास भाविकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपन करुन पुन्हा एकदा या परिसरात हिरवाई निर्माण करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी अजित जगताप, केदार जोशी, पद्मनील कणसे, सुरज लोहार यांनी केली आहे.