येथील कूपर कॉलनीमध्ये असणारा विमल दत्त बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा १९ लाख ३९ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याने सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सातारा : येथील कूपर कॉलनीमध्ये असणारा विमल दत्त बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा १९ लाख ३९ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याने सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 27 ते 29 मे या कालावधीत घडली आहे. तक्रारदार हे सातार्यातील बंगल्यामध्ये सध्या एकटे राहत आहेत. कामानिमित्त ते पुण्याला गेले होते. यावेळी चोरट्यांनी बंद घर पाहून लॉकर व ड्रॉव्हरमधून 380 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 40 हजार रुपये असा एकूण 19 लाख 39 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना समोर आल्यानंतर परिसर हादरुन गेला. या घटनेनंतर तक्रारदार यांनी तात्काळ सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर चोरी झालेले सोने व रक्कम ऐकून पोलिसही हादरुन गेले. यानंतर पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पाचारण केले. वरीष्ठ पोलिस अधिकार्यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर रविवारी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली.


