maharashtra

बिगूल वाजवून छत्रपती शिवरायांना मानवंदना

समता सैनिक दलाचे अनोखे अभिवादन

ऐतिहासिक साताऱ्यात समता सैनिक दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शहारातून संचलन करत व बिगूल वाजवून महाराजांना मानवंदना देवून अभिवादन केले गेले.

सातारा : ऐतिहासिक साताऱ्यात समता सैनिक दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शहारातून संचलन करत व बिगूल वाजवून महाराजांना मानवंदना देवून अभिवादन केले गेले. समता सैनिक दलाचे प्रमूख अरुण पोळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जयघोषाच्या निनादत भव्य पुष्पहारही अर्पण करण्यात आला.
महाराजांच्या जयंतीनिमित्त 'भीमराय ते शिवराय' हा परिवर्तनशील विचारांचा जागर व्हावा आणि समस्त बहुजनांच्या कल्याणात आनंद मानणारे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचे मूल्य प्राधान्याने जपले जावे, शिवाय सामाजिक सलोखा अबाधित रहावा या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून संचलनास प्रारंभ करण्यात आला. हे संचलन सवाद्यासह कर्मवीर भाऊराव पथ मार्गे छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याजवळ पोहचले. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनभेदी जयघोषाने अवघा परिसर दणाणून गेला.
समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ व अरुण भोसले यांनी छत्रपती शिवाजी महारजांच्याबद्दलचे आणि एकूणच जयंती उत्सवाचे महत्त्व विषद केले. यावेळी कमांडर इन चिफ वसंत वाघमारे, कमांडर आकाश कांबळे, कमांडर यशपाल बनसोडे, कमांडर शिवनाथ जावळे, विश्वनाथ गायकवाड, मोहन यादव, प्रियांका गडगे, पूजा साळुंखे, सोनल देखणे, तुकाराम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, चंद्रकांत कांबळे यांच्यासह महार रेजिमेंटचे व समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थिती होती. या ऐतिहासिक मानवंदनेमुळे एक निळा आणि एक भगवा दाही दिशांना लावी दिवा, या गाण्याचे बोल सर्वांच्या ओठावर रेगांळत राहिले.