maharashtra

साताऱ्यात विश्व हिंदू परिषदेने मांडले शिंदे सरकारचे आभार


शिवप्रताप दिन शासकीय पातळीवर सुरू झाला हे सुद्धा एक प्रकारचे अभिनंदन यश आहे अशी कृतज्ञ भावना विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अवधूत उर्फ बाबूजी नाटेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

सातारा : प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखान कबर परिसरातील अतिक्रमण गनिमी काव्याने काढून शिंदे सरकारने महाराष्ट्रातील जनसामान्याच्या मनातील भावनेला हात घातला आहे त्यामुळे या सरकारचे निश्चितच हार्दिक अभिनंदन करायला हवे. शिवप्रताप दिन शासकीय पातळीवर सुरू झाला हे सुद्धा एक प्रकारचे अभिनंदन यश आहे अशी कृतज्ञ भावना विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अवधूत उर्फ बाबूजी नाटेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
नाटेकर पुढे म्हणाले, प्रतापगडावरील अफजलखानाच्या थडग्याचे उदातीकरण करून एका आतातायी आक्रमकाला संतांच्या रांगेत बसवणे ही समाजाची फसवणूक असून इतिहासाशी गद्दारी आहे. ज्याने तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर व पंढरपूरचे विठ्ठल मंदिर फोडले व अनन्वित अत्याचार केले त्याला छत्रपती शिवरायांनी अतुल पराक्रमाद्वारे अद्दल घडवली. या कबरीच्या निमित्ताने अफजलखान प्रकरणाचे होणारे उद्दातीकरण हे विश्व हिंदू परिषदेला सहन होणारे नव्हते म्हणूनच हे जनसंघटनात्मक आंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनात भुजंगराव घुगे मी स्वतः दीपक गायकवाड, श्रीकांत पोतनीस, किशोर चव्हाण, अतुल शालगर, रवी कोठाळे, अरविंद कांबळे, शिरीष सरपोतदार, कल्याणी पंडित, गोपाळशेठ यांनी सहभाग घेतला होता. प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले, मिलिंदराव एकबोटे, नंदकिशोर एकबोटे हे सुद्धा आंदोलनात सहभागी होते . त्यांचेही या आंदोलनाला मार्गदर्शन लाभले. या आंदोलनामुळे दरवर्षी शिवप्रताप दिन शासकीय पातळीवर सुरू झाला आणि अफजलखान ट्रस्ट बेकायदेशीर ठरला. कबर परिसरातले अवैध बांधकाम पाडले गेले या सर्व घटना जनसामान्यांच्या भावना बोलून दाखवतात शिंदे सरकारने कबर परिसरातील अतिक्रमण पाडले. त्यासंदर्भात त्यांचे निश्चितच अभिनंदन करायला हवे . या आंदोलनाचा आदर्श ठेवून देशावर आणि समाजावर झालेल्या आक्रमणाच्या व अत्याचाराच्या खुणा पुसून टाकल्या पाहिजेत. तरच समाजाची मानसिक गुलामगिरी संपेल आणि समाज खमकेपणाने उभा राहील अशी अपेक्षा बाबूजी नाटेकर यांनी व्यक्त केली.  यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल शालगर,बजरंग दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवी कुमार कोठाळे इत्यादी यावेळी उपस्थित होते.