maharashtra

केवळ दहा महिन्यांच्या पुतण्याचा काकाने विहिरीत फेकून केला खून

घरगुती वादातून केले भयंकर कृत्य; दत्तनगर कोडोली येथील दुर्दैवी घटना

uncle killed his only ten-month-old nephew
सातारा शहरालगत असणार्‍या दत्तनगर कोडोली येथे अष्टविनायक कॉलनीमध्ये घरगुती वादातून सख्ख्या चुलत्याने केवळ दहा महिन्यांच्या भावाच्या मुलाला विहिरीत टाकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. शाल्मोन मयूर सोनवणे असे या दुर्दैवी बाळाचे नाव आहे.

सातारा : सातारा शहरालगत असणार्‍या दत्तनगर कोडोली येथे अष्टविनायक कॉलनीमध्ये घरगुती वादातून सख्ख्या चुलत्याने केवळ दहा महिन्यांच्या भावाच्या मुलाला विहिरीत टाकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. शाल्मोन मयूर सोनवणे असे या दुर्दैवी बाळाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय मारुती सोनवणे याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या सख्ख्या थोरल्या भावाचा मुलगा शलमोन याला शनिवारी घरातून बाहेर नेले. त्यानंतर सातारा एमआयडीसी कॅनॉल जवळ असलेल्या दत्तनगर येथील विहिरीत त्याला फेकून दिले. घरच्यांनी शलमोनचा शोध घेतला असता तो सापडला नाही. सरते शेवटी कॉलनीतीलच एकाला या चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत असल्याचे आढळून आले.
नागरिकांनी त्या चिमुकल्याला पटकन बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकाराची माहिती घेतली असता चिमुकल्याचा चुलता अक्षय सोनवणे याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. सातारा शहर पोलिसांनी अक्षयला काही तासातच अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. माझे आई-वडील माझा सख्खा भाऊ मयूर सोनवणे यांच्याकडे जास्त लक्ष देतात आणि मला नेहमी वाईट नजरेने पाहतात, याचा राग मनात धरून मी माझ्या भावाच्या बाळाला विहरीत फेकून दिले, अशी खळबळजनक कबुली त्याने पोलिसांना दिली.
अक्षय सोनवणे हा अविवाहित असून तो एमआयडीसी येथे काम करतो. अक्षयच्या या क्रूर कृत्याबद्दल कोडोली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे अधिक तपास करत आहेत. अक्षय सोनवणे हा स्वभावाने तापट आणि धरसोड प्रवृत्तीचा होता. त्यामुळे घरात त्याला फारशी किंमत दिली जात नव्हती. घरच्यांचा आपल्यावर विश्वास नाही, या वैफल्यग्रस्त भावनेतूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी बोलताना सांगितले.