maharashtra

दारुड्याने उडवली सात वाहने

सुदैवाने जिवितहानी नाही; गाड्यांचे मात्र नुकसान

Seven vehicles blown up by alcoholic
सोमवारी रात्री सातार्‍यातील राजपथावर नगरपालिका ते कमानी हौदापर्यंत अपघाताचा थरार उडाला. मद्यधुंद चारचाकी चालकाने चार चारचाकी व तीन दुचाकींना बेदरकारपणे धडक दिली. या अपघात सत्राने राजपथ हादरला असून प्राथमिक माहितीनुसार सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सातारा : सोमवारी रात्री सातार्‍यातील राजपथावर नगरपालिका ते कमानी हौदापर्यंत अपघाताचा थरार उडाला. मद्यधुंद चारचाकी चालकाने चार चारचाकी व तीन दुचाकींना बेदरकारपणे धडक दिली. या अपघात सत्राने राजपथ हादरला असून प्राथमिक माहितीनुसार सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी रात्री नऊ वाजता राजवाडा दिशेने जाणार्‍या क्विड गाडीवरील चालकाने सातारा नगरपालिकेसमोर पहिली दुचाकी उडवली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचा खुळखुळा झाला. सुदैवाने दुचाकीवरील चालक उडून पडल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. पुढे याच क्विड चालकाने चारचाकी, दुचाकींना धडक देत कमानी हौद गाठले. कमानी हौदाजवळ क्विड चालकाची गाडी झाडाला धडकल्याने ती थांबली. तोपर्यंत मद्यधुंद चालकाने चार चारचाकी व तीन दुचाकींना उडवले होते. अपघाताची ही मालिका सुरु असताना नागरिक, इतर वाहनचालक जिवाच्या आकांताने वाहने जागीच सोडून बचावासाठी बाजूला झाली. मद्यधुंद चालक पुढे गेल्यानंतर त्याला पकडण्यासाठी काहीजणांनी त्याचा पाठलागही केला. अखेर मद्यधुंद चालक सापडल्यानंतर संतप्त जमावाने त्याला चोप दिला.
अपघात सत्राची मालिका सातारा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडल्याने पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाला शांत करीत मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले. या अपघात सत्राने तब्बल अर्धा तास राजपथ स्तब्ध झाला. घटनास्थळांचा पंचनामा करुन टोईंग च्या माध्यमातून अपघातग्रस्त चारचाकी व दुचाकी हलविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.