जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढ्यात खुलेआम दारू विक्री सुरू आहे. याबाबत कोणीही आवाज उठवत नसल्याने अखेर चक्क एका महिलेने देशी दारू पकडून दिली. यामुळे महिलेने पोलिसांची नशा उतरवली, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सातारा : जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढ्यात खुलेआम दारू विक्री सुरू आहे. याबाबत कोणीही आवाज उठवत नसल्याने अखेर चक्क एका महिलेने देशी दारू पकडून दिली. यामुळे महिलेने पोलिसांची नशा उतरवली, अशी चर्चा सुरू झाली आहे.
जावली तालुक्यातील रणरागिनींनी एकत्र येवून अकरा वर्षांपूर्वी म्हणजे २००९ साली संपूर्ण तालुक्यातील सहा गावातून तेरा अधिकृत दारूची दुकाने बंद करून देशातील पहिला दारू दुकानमुक्त तालुका म्हणून जावळीचा नावलौकीक मिळविला आहे. परंतू, गेले अनेक महिने उत्पादन राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पुढारी व पोलिस खात्याच्या दुर्लक्षामुळे अवैध दारू विक्रेत्यांनी थैमान घातले होते. आज सोमवारच्या बाजार दिवशी रस्त्यावर उभे राहून दारू विक्री खुलेआम सुरू होती. अशावेळी जवळवाडी गावच्या सरपंच वर्षाताई जवळ यांनी देशी दारूने भरलेली पिशवी त्या दारू विक्रेत्याकडून अक्षरश: हिसकावून घेतली व मेढा पोलिसांच्या स्वाधिन केली आहे.
जावली तालुक्यातील महिलांनी व व्यसनमुक्त युवक संघाने लढा उभारून दारूबंदी करून जावली तालुक्याला नावलौकीक प्राप्त करून दिला. या दारूबंदी नंतर अवैध दारू विक्रेत्यांना कायद्याचा धाकच नसल्याने खुलेआम दारूविक्री करण्याचे धाडस हे अवैध दारूविक्रेते करीत आहेत. या भागातील तहसिलदार कार्यालय इतर ठिकाणी हलवू नये, अशी मागणी करण्यात आली. पण, बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दारूविक्री बाबत कधी ही ठोस पावले उचलली नाही. मात्र सौ जवळ यांनी धाडस करून दारू पकडून दिली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस दलाने त्यांचा सन्मान करावा तसेच त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. या पिशवीत ४६ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्या मेढा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आल्या आहेत. ही दारू विक्री करणारा आरोपी कोणाच्या सांगण्यावरून मेढा येथे खुलेआम दारू विक्री करीत होता. याचा मेढा पोलिसांनी खुलासा करावा. अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा व्यसनमुक्ती चळवळीने दिला आहे.


