सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 138 कोटी रुपयांचा करोत्तर नफा
बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2021- 22 या आर्थिक वर्षाअखेर 138 कोटी 17 लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ नफा हा 67 कोटी रुपये असून राखीव निधीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2021- 22 या आर्थिक वर्षाअखेर 138 कोटी 17 लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ नफा हा 67 कोटी रुपये असून राखीव निधीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले, दत्ता नाना ढमाळ इत्यादी यावेळी उपस्थित होते.
नितीन पाटील पुढे म्हणाले, यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये बँकेने 163 कोटी 70 लाख रुपयांचा करपूर्व नफा मिळवला यामध्ये 25 कोटी 52 लाख रुपयांचा आयकर भरलेला आहे. म्हणजे करोत्तर नफा 138 कोटी 17 लाख रुपये इतका झाला आहे. बँकेकडे 9122 कोटी तीन लाख रुपयांच्या ठेवी असून पाच हजार 112 कोटी रुपयांची कर्जे आहेत. बँकेचा संमिश्र व्यवसाय 14234 कोटी 84 लाख रुपये झाला आहे. बँकेच्या स्वनिधी मध्ये 69 कोटी रुपये इतकी भरीव वाढ झाली असून बँकेचे स्वनिधी एकूण 739 कोटीचे आहेत.
रिझर्व बँकेच्या सूचनेप्रमाणे सरकारी कर्जरोखे आणि बँकांमध्ये सुरक्षित गुंतवणूक पाच हजार 194 कोटी रुपये 32 लाख इतकी जिल्हा बँकेने केली आहे. बँकेची अनुत्पादक कर्जे दहा कोटी 4 लाख असून एकूण कर्जाची हे प्रमाण शून्य पॉईंट वीस टक्के इतके आहे शेतकऱ्यांसाठी एक ते तीन लाख रुपये पर्यंत च्या पीक कर्जाला दोन टक्के, अल्पमुदतीच्या तीन लाखावरील सोसायटी कर्जदारांना अडीच टक्के शेतकरी सभासदांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदर देण्यात आला आहे. शैक्षणिक कर्जावर व्याज परताव्यासाठी एक कोटी 9 लाख 40 हजार रुपयांची तरतूद जिल्हा बँकेने केली आहे. देशामध्ये या प्रकारचा कर्जपुरवठा करणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमेव आहे. बँकेने विकास संस्था सभासदांना मध्यम व दीर्घ मुदत कर्ज वसूल पात्र हप्त्यावर सहा टक्के व्याजदर सवलत दिली असून चार कोटी व्याजाचा परतावा दिला आहे.
तेरा वर्षापासून वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना तीन लाखापर्यंत चे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्यात आले आहे. सोसायटी इमारत व गोडाऊन बांधकामासाठी सुद्धा जिल्हा बँक शून्य टक्के व्याज दराने कर्ज देत आहे. बँकेने 67 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून राखीव निधीसाठी 20 कोटी 56 लाखाची तरतूद केली आहे. शेती पतसंस्था स्थैर्यनिधी साठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून इमारतीसाठी 1 कोटी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संशयित व बुडीत कर्ज निधीसाठी 39 कोटी 22 लाख आठ हजार रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. म्हणून अडीच कोटी रुपये विशेष निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले.


