maharashtra

रामनगर येथे युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार

युवक गंभीर जखमी ; तिघांना अटक

At Ramnagar, a youth was stabbed in the head with a scythe
रामनगर, ता. सातारा येथे शुक्रवारी रात्री तेथीलच एक युवक शतपावली करत असताना रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटल्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित युवक कौशल बेबले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सातारा : रामनगर, ता. सातारा येथे शुक्रवारी रात्री तेथीलच एक युवक शतपावली करत असताना रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटल्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित युवक कौशल बेबले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कौशल लक्ष्मण बेबले वय २६, रा. रामनगर, सातारा हा शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठ वाजता गावातूनच शतपावली करत निघाला होता. त्यावेळी प्रथमेश बाळासाहेब जगताप वय २०, रा. वर्ये, ता. सातारा, आदर्श हणमंत रणखांबे वय २१, रा. मंगळापूर, ता. कोरेगाव, अनिल रत्नदीप जाधव वय २३, तांदूळवाडी, ता. कोरेगाव हे संशयित रस्त्याच्याकडेला बसले होते. त्यांनी दुचाकी रस्त्यात लावली होती. ही दुचाकी बाजूला काढ, असे कौशल बेबले याने सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दीक वादावादी झाली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. रात्री पावणेदहा वाजता वरील संशयितांनी आपले सात ते आठ मित्र आणून कौशल बेबलेवर हल्ला केला. यावेळी आदर्श रणखांबे याने कौशलच्या डोक्यात कोयता मारला. तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली.
कौशलचे भाऊ व मित्र तेथे येताच संशयितांनी तेथून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या कौशलला तातडीने साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकाराची सातारा तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघांना अटक केली. त्यांचे इतर साथीदार फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.