ओबीसीच्या आरक्षणासाठी जिल्हयात गटारी अमावस्येचा मुहूर्त
सातारा, महाबळेश्वर, पाचगणी पालिका व मेढा नगरपंचायत आरक्षण सोडत 28 जुलै रोजी
राज्य निवडणूक आयोगाकडून गुरुवारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये सातारा, महाबळेश्वर, पाचगणी नगरपालिका व मेढा नगरपंचायतीच्या आरक्षणासाठी गटारी अमावस्येचा मुहूर्त शोधण्यात आला आहे.
सातारा : राज्य निवडणूक आयोगाकडून गुरुवारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये सातारा, महाबळेश्वर, पाचगणी नगरपालिका व मेढा नगरपंचायतीच्या आरक्षणासाठी गटारी अमावस्येचा मुहूर्त शोधण्यात आला आहे. गुरुवार, 28 जुलै रोजी ज्या-त्या पालिका कार्यक्षेत्रात अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण वगळून केवळ खुल्या गटातून ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जिह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, रहिमतपूर, म्हसवड, महाबळेश्वर व पाचगणी या पालिकांसाठी ओबीसी वगळून आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर ओबीसी आरक्षणाचा विषय चर्चेचा ठरला. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा ओबीसींना राजकीय आरक्षण जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी होऊ घातलेल्या सर्व पालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगित करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, गुरुवारी निवडणूक आयोगाकडून ओबीसी आरक्षणाचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
यामध्ये जिल्ह्यातील सातारा, महाबळेश्वर व पाचगणी या पालिका व मेढा नगरपंचायतीचा समावेश आहे. मेढा वगळता तिन्ही पालिकांसाठी पूर्वी काढण्यात आलेले अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण कायम ठेवून खुल्या गटातून ओबीसी आरक्षण निश्चित केले जाणार आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीची नोटीस मंगळवार, दि. 26 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही नोटीस पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. यानंतर 28 जुलै रोजी त्या-त्या पालिकेत आरक्षण सोडत काढली जाईल.29 जुलै ते 1ऑगस्ट या कालावधीत आरक्षण व सोडत या अनुषंगाने हरकती व सूचना मागविणे, 2 ऑगस्टला आरक्षण सोडतीचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविणे, 4 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी नगरपालिकेच्या सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देणे, तर 5ऑगस्ट रोजी रोजी सदस्य पदांच्या आरक्षणाची अंतिम माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.
पाच पालिकांचे पुढील टप्प्यात आरक्षण ?
निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील फलटण, कऱ्हाड, वाई, रहिमतपूर व म्हसवड या पाच पालिकांचा अंतिम निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे हा कार्यक्रम तूर्त स्थगित केला आहे. ओबीसी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात या पाचही पालिकांची नावे नसल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला.


