maharashtra

विश्रामगृहाचे विस्तारीकरण व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमीपुजन

अजित पवार यांच्या हस्ते भूमीपुजन

Expansion of Rest House and Bhumi Pujan at the hands of Deputy Chief Minister Ajit Pawar of Government Medical College Laboratory
सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

सातारा : सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे आदी उपस्थित होते.
विस्तारीत विश्रामगृह साताराच्या वैभवात भर घालेल
यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सातारा येथे 13 कोटी 12 लाख खर्च करुन विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. 1 व्हीव्हीआयपी कक्ष, 2 व्हीआयपी कक्ष व 5 साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. तसेच मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहेत. हे विस्तारीत विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल.
सातारच्या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधांसाठी 300 कोटी
सातारचे सैनिक स्कूल हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी प्रत्येक वर्षी 100 कोटी या प्रमाणे 300 कोटी देण्यात येणार आहे. येथे कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. त्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही
सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीने करावा. महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसे उभे राहिल यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. तसेच स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करावे. तसेच महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा संस्थेसाठी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळाच्या उभारणीला 12 कोटी 99 लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रयोग शाळेत म्युझियम, व्याख्यान कक्ष, डेमो रुम, विभाग प्रमुखांसाठी कक्ष अशा सुविधा असणार आहेत.
राज्यात रूग्णसंख्या वाढली तर कठोर उपाययोजना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले लॉक डाऊनचे संकेत
राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. राज्यातील 10 मंत्री आणि जवळपास 20 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आज साताऱ्यात त्यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. करोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागात केली जाईल,' असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन केलंय. देशातील अनेक राज्यांत सध्या रात्रीची संचारबंदी सुरू आहे. दिल्ली, बंगळुरुतही त्याची काटेकोट अंमलबजावणी होत आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस आपण मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळं या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे,' असं अजित पवार म्हणाले.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या १०० टक्के लोकांनी वापरले मास्क
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या वास्तूच्या नुतनीकरणाचं उद्घाटन आज अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या १०० टक्के लोकांनी मास्क वापरले होते. या नियम पालनाची सर्वत्र एकच चर्चा सुरू होती. साताऱ्यात एखाद्या राजकीय नेत्याच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात १०० टक्के मास्क हे पहिल्यांदाच घडले. मास्क वापराबाबत अजित पवारांच्या आग्रहाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. साताऱ्यातील कार्यक्रमांबद्दलही त्यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनाच कळवलं होते. त्यामुळं गर्दी टाळता आली. अजित पवार हे स्वत:च मास्क घालण्यासाठी नेहमी आग्रही असतात आणि कोणी मास्क शिवाय समोर आल्यास त्याला खडे बोल सुनावल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या कार्यक्रमात विनामास्क येण्याचं धाडस सहसा कोणी करत नाही.