सातारा एमआयडीसीतील युटोपिया कंपनीतील 13 कोटी 64 लाख 71 हजार 876 रुपयांच्या चोरी, अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सातारा : सातारा एमआयडीसीतील युटोपिया कंपनीतील 13 कोटी 64 लाख 71 हजार 876 रुपयांच्या चोरी, अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
समीर शंकर वाघ (रा. कोटेश्वर कॉलनी, करंजे तर्फ सातारा) व राहूल दिगंबर गोळवीलकर (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) अशी अटक केलेल्या व पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रसन्न देशमुख यांनी 19 जणांविरुध्द तक्रर दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार प्रसन्न देशमुख व एका संशयित आरोपीसोबत सातारा एमआयडीसीमध्ये भागीदारीमध्ये युटोपिया कंपनी आहे. मात्र पार्टनरने इतर संशयित आरोपी यांना हाताशी धरुन कंपनीतील ट्रेडमार्क असलेले डिझायनिंग चोरले. कंपनीचे उत्पादन कमी पैशात घेवून ते बाहेर मार्केटमध्ये अवाजवी किंमतीला विकून कंपनीचे नुकसान केले. तसेच अस्तित्वात नसलेल्या कंपनीला सॉफ्टवेअरची आर्डर दिली असे दाखवून कंपनीतील रक्कम लांबवली. बिलामध्ये फेरफार करणे, बनावट शेल नावाने कंपनी अस्तित्वात आणून त्याद्वारे रक्कम काढणे, असे बेकायदेशीर कृत्य करत 14 कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पुढे याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. गेल्या तीन महिन्यांपासून याप्रकरणी अटकसत्राची कारवाई सुरु आहे. रविवारी दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी भोसले, पोलिस हवालदार संजय मोरे, मनोज जाधव यांनी केली आहे.


