शेतकरी सन्मान निधीचा दहावा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार
भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची माहिती
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दहावा हप्ता शनिवार १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या योजनेच्या १० कोटी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सातारा : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दहावा हप्ता शनिवार १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या योजनेच्या १० कोटी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याच कार्यक्रमात ३५१ शेती उत्पादक संघांना (एफपीओ ) अनुदानही वितरीत केले जाणार आहे.
विक्रम पावसकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, २४ फेब्रुवारी २०१९ पासून या योजनेला प्रारंभ करण्यात आला. मुख्यत: छोट्या शेतकऱ्यांची गरज ओळखून २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. गेली ३ वर्षे शेतकरी सन्मान निधी योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे.
मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दीर्घकाळ देशाची व अनेक राज्यांची सत्ता भोगलेल्या कॉंग्रेसने शेतकऱ्यांना मदत देण्याच्या केवळ घोषणाच केल्या. मोदी सरकारने मात्र छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम पाठवत शेतकऱ्यांना आधार दिला आहे. आजवर या योजनेतून १. ६ लाख कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहितीही विक्रम पावसकर यांनी दिली.


