रेल्वेची महाराष्ट्रासाठी 13 हजार 539 कोटीची विक्रमी तरतूद
भा ज पा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
2023- 2024 साठीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी विक्रमी तरतूद केली आहे. यापूर्वीच्या सन 2009 ते 2014 दरम्यान महाराष्ट्राला फक्त 1171 कोटींची तरतूद केली होती.
सातारा : 2023- 2024 साठीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी विक्रमी तरतूद केली आहे. यापूर्वीच्या सन 2009 ते 2014 दरम्यान महाराष्ट्राला फक्त 1171 कोटींची तरतूद केली होती. याउलट सन 2023-24 या फक्त एक वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव अशी 13 हजार 539 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही यापूर्वीच्या तरतुदींच्या 11.6 पटींनी जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानके अत्याधुनिक होणार आहेत. या यादीत जिल्यातील सातारा, कराड व लोणंद रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आलेला आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, "सध्या आपल्या राज्यात पस्तीस रेल्वे प्रकल्पांवर कामे चालू आहेत. ज्यामध्ये सुमारे 6 हजार 142 किमी ची कामे आहेत. यांची किंमत 91 हजार 137 कोटी रु. होते. चालू असलेल्या कामामध्ये सातारा जिल्यातून जाणाऱ्या मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण याचा समावेश आहे. तसेच जिल्यातील सर्व रेल्वे क्रॉसिंग च्या जागेवर उड्डाणपूल बांधण्याची कामे चालू आहेत. या कामामुळे वाहतूक खोळंबा व अपघात टाळण्यास मदत होणार आहे.
तसेच या वर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन 18 मार्गांचे तांत्रिक, आर्थिक सर्वेक्षण पण प्रस्थावीत आहे. तसेच राज्यशासनाच्या भागीदारीने देखील अनेक नवीन रेल्वे मार्गांचे कामे केली जाणार आहेत. ज्यामध्ये जिल्यातील फलटण- पंढरपूर मार्गाचा समावेश आहे. तसेच कोल्हापूर- वैभववाडी या कोकणाला जोडणाऱ्या मार्गाचा देखील समावेश आहे. या व्यतिरिक्त राज्यात 74 स्थानकांवर एक स्थानक एक वस्तू या योजनेत समावेश केला आहे, यामुळे स्थानिक वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
अश्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये रेल्वेची घोडदौड जोरात चालू आहे. सध्या राज्यात अनेक मार्गावर वंदे भारत या रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे. यातील काही मार्गांवर यापूर्वीच या नवीन प्रकारच्या रेल्वे चालू झाल्या आहेत. राज्यात रेल्वेच्या विविध प्रकल्पासाठी भरीव व विक्रमी तरतूद केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी संपूर्ण जिल्हावासीयांच्या वतीने धन्यवाद दिले आहेत.


