पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा गुन्हेगारांना आणखी एक टोला
कराड शहरातील गंभीर गुन्ह्यांमधील तीन जण दोन वर्षासाठी तडीपार
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुन्हेगारांच्या मागे तडीपारचे शस्त्र परजत कराड शहरातील गंभीर गुन्ह्यांमधील तीन जण दोन वर्षासाठी तडीपार केले आहेत.
सातारा : जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुन्हेगारांच्या मागे तडीपारचे शस्त्र परजत कराड शहरातील गंभीर गुन्ह्यांमधील तीन जण दोन वर्षासाठी तडीपार केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खुनासाठी अपहरण आदी गंभीर गुन्ह्यांमधील टोळीचा प्रमुख अविनाश अशोक येडगे वय 24, पृथ्वीराज बळवंत येडगे वय 24, देवेंद्र अशोक येडगे वय 22 सर्व राहणार जखीनवाडी तालुका कराड यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. त्याची सखोल चौकशी करून कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बी. रणजीत पाटील यांनी आपला अहवाल सादर केला होता. या अहवालाची दखल घेत हद्दपार प्राधिकरण तथा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वरील तिघांना दोन वर्षासाठी पूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, शिराळा तालुका हद्दीतून हद्दपारचा आदेश केला आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या टोळीतील संशयितांच्या हालचालींमध्ये प्रतिबंध झाला नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले आहे. वरील तिघांना कायद्याचा धाक नसून ते बेकायदेशीर कारवाया करीतच आहेत. त्यांना सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. तसेच त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. त्यामुळे जनतेमधून या तिघांवर कडक कारवाई करण्याकरता मागणी होत होती.
या कारवाईत हद्दपार प्राधिकरणा पुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईबाबत सर्व स्तरातून स्वागत होत आहे.