maharashtra

नारीशक्ती मध्ये समाज घडवण्याचा मोठा वाटा

डॉक्टर सुयोग दांडेकर यांचे प्रतिपादन; जिजाऊ प्रतिष्ठान व नारायणी ग्रुप च्या वतीने 21 महिलांचा सत्कार

समाजाची जडणघडण करण्याची अभूतपूर्व ताकद स्त्रियांमध्ये आहे. जटील आव्हाने पेलण्याची क्षमता स्त्री अस्मितेमध्ये आहे, असे प्रतिपादन साताऱ्याचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुयोग दांडेकर यांनी केले.

सातारा : समाजाची जडणघडण करण्याची अभूतपूर्व ताकद स्त्रियांमध्ये आहे. जटील आव्हाने पेलण्याची क्षमता स्त्री अस्मितेमध्ये आहे, असे प्रतिपादन साताऱ्याचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुयोग दांडेकर यांनी केले.
येथील जिजाऊ फाउंडेशन आणि एफ एचडी नारायणी ग्रुप यांच्या वतीने साताऱ्यातील 21 महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोना बुवा रामदासी, एफ एचडी च्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर माधवी जोग, सातारा जिल्हा अध्यक्ष सुरेखा मोरे, जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धी पवार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉक्टर दांडेकर पुढे म्हणाले, स्त्री अस्मिता आणि स्त्री अभिव्यक्ती ही रचनात्मक आणि मानवतावादी आहे. आजच्या युगामध्ये कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती स्त्रियांमध्ये आहे. त्यांची उत्तुंग कार्यक्षमता आणि अभिव्यक्ती या मधूनच निकोप समाज घडवला जाऊ शकतो. महिलांची सजगता आणि साक्षरता ही निश्चितच समाज बांधणीला दिशा देऊ शकते. आपल्यातील सुप्त गुण ओळखून त्या कलागुणांना त्यांनी सातत्याने वाव द्यावा. स्तोत्रपठण व पौरोहित्य करणाऱ्या महिलांनी आरोग्याची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे पण त्यांनी विषद केले.
सोना बुवा यांनी आदिशक्ती मातृशक्तीची ताकद कशी असावी तर मातोश्री राणूबाई आणि जिजामाता यांच्यासारखी. ती असल्यास रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे व्यक्तिमत्व घडते. अशा व्यक्तिमत्त्वांची समाजाला नितांत गरज आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. शोभना नातू व उमाबाई आटले यांच्या विद्यार्थिनींनी श्री सूक्त पठण केले. वैशाली भोसेकर व मोहना आपटे यांच्या ग्रुपने जोगवा तसेच वंदना राणेंच्या ग्रुपने गोंधळ गीत सादर केले. नारायणी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी तुपाचे प्रज्वलित दीप हातात घेऊन कालीतांडव स्तोत्राचे पठण केले. कार्यक्रमाची सांगता जयस्तुते या देशभक्तीपर गीताने झाली. कार्यक्रमाची संकल्पना मनीषा पांडे यांची होती, तर ममता जोशी यांनी सूत्रसंचालन केले.