maharashtra

खुनाचा प्रयत्न करणारे झाले जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई

पंचायत समितीच्या माजी उपसभापती वर खुनी हल्ला करणारे दोघेजण जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि सातारा तालुका पोलीस ठाणे यांना यश आले आहे.

सातारा : पंचायत समितीच्या माजी उपसभापती वर खुनी हल्ला करणारे दोघेजण जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि सातारा तालुका पोलीस ठाणे यांना यश आले आहे.
रोहन सुनील शिंदे वय 19 आणि ओंकार आनंदराव सोनमळे वय 20 दोघेही राहणार लिंब, तालुका सातारा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 1 जानेवारी रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास लिंब ते चतुर बेट गावच्या हद्दीत चतुर बेट ते बारा मोटाची विहीर जाणाऱ्या रस्त्यावर जितेंद्र सर्जेराव सावंत यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे संशयितांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यातील दोन तपास पथके तयार करण्यात आली.
दिनांक 4 जानेवारी रोजी अरुण देवकर आणि विश्वजीत घोडके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, या गुन्ह्यातील आरोपी हे कोरेगाव शहरात फिरत आहेत. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याची तपास पथके या संशयितांच्या शोधकामी कोरेगाव येथे रवाना झाली. माहितीच्या अनुषंगाने कोरेगाव येथे जाऊन संशयितांना त्यांचा शोध घेतला असता हे संशयित कोरेगाव शहरातील गारवा हॉटेल परिसरात सापडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सात जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार विजय कांबळे, अतिश घाडगे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, संतोष सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम व सातारा पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.