नेर ता. खटाव येथील तलावात आजअखेर सरासरी 70 ते 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी उन्हाळ्यात मान्सून पूर्व पावसाने अद्याप ही हजेरी लावली नाही. त्यामुळे येरळा नदी लगतच्या नळ पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरेसे उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
पुसेगाव : नेर ता. खटाव येथील तलावात आजअखेर सरासरी 70 ते 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी उन्हाळ्यात मान्सून पूर्व पावसाने अद्याप ही हजेरी लावली नाही. त्यामुळे येरळा नदी लगतच्या नळ पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरेसे उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी नगदी पिके सुकू लागली आहे. कृष्णा सिंचन विभागाने सोमवार दि. 20 अखेर येरळा नदीला पाणी सोडले नाही तर, खटावच्या कार्यालयावर धडक मोर्चा व खटाव येथे पुसेगाव-वडूज रत्यावर रस्ता रोको केला जाईल, असा इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिला आहे.
प्रदीप विधाते म्हणाले, खटाव तालुक्यात गतवर्षी पर्जन्यमान चांगले झाले होते. जिहे कठापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली आहे. पावसाच्या पाण्याने व जिहे कठापूर योजनेच्या पाण्याने नेर तलाव 100 टक्के भरला होता. कृष्णासिंचन विभागाने रब्बी हंगामात पाणी सोडण्याचे कष्ट घेतले नाहीत. संबधित विभागाच्या नाकर्तेपणामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना गरज नसताना संबंधितांनी भर उन्हाळ्यातील एप्रिल महिन्यात पाणी सोडले होते. त्याचा कणभर फायदा शेतकऱ्यांना घेत आला नाही.
सध्या नेर तलावात 70 ते 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात मान्सूनपूर्व पावसाने अद्याप हजेरी लावली नाही. त्यामुळे येरळानदी पूर्णतः कोरडी पडलेली आहे. परिणामी येरळा नदीकाठी असणाऱ्या नेर, पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, भांडेवाडी, खटाव, भुरकवडी, कुरोली, नागाचे कुमठे यासह अनेक गावच्या सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनांना पुरेसे पाणी मिळत नाही. सध्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची ऊस, आले, नगदी व बागायती पिके सुकू लागली आहेत. कोरोना काळात शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात अधिक पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते. रब्बी हंगाम कसाबसा यशस्वी झाला आहे. परंतु सध्या अनेक गावांना व नगदी पिकांना पाणी नाही. नेर तलावात मुबलक पाणीसाठा आहे. मान्सून सुरू झाल्यानंतर पावसाचे व जिहे कठापूर योजनेचे पाणी नेर तलावात येणार आहे. त्यामुळे नेर तलाव तातडीने भरणार आहे.
कृष्णासिंचन विभागाने नेर तलावातील पाणी सोमवार दि. 20 जून अखेर येरळानदीला सोडण्यासंदर्भात तातडीने नियोजन करावे. अन्यथा मंगळवार दि. 21 जून रोजी कृष्णासिंचन विभागाच्या खटाव कार्यालयावर धडक मोर्चा व वडूज - पुसेगाव रस्त्यावर रस्ता रोको केला जाणार आहे. या आंदोलनात अनेक गावचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कामचुकार अधिकाऱ्यांची चौकशी करावी
येरळानदी लगतच्या पाणी पुरवठा योजना व शेतकरी कृष्णा सिंचन विभागाकडे पाणी सोडण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी करीत आहेत. परंतु संबधित अधिकारी ग्रामपंचायत व शेतकऱ्याचे पैसे भरून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा कामचुकार अधिकारी व कर्मचऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी प्रदीप विधाते यांनी केली आहे.


