श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने दुमदुमली शाहूनगरी
दत्त दर्शनासाठी भाविकांची शहरात गर्दी
ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व पारंपारिक पद्धतीने शनिवारी दत्तजयंती साजरी करण्यात आली.
सातारा : ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व पारंपारिक पद्धतीने शनिवारी दत्तजयंती साजरी करण्यात आली.
आनंदवाडी दुर्गा पेठ, प्रतापगंज पेठ, गेंडामाळ येथील दत्तमंदिरात भाविकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत दत्त दिगंबरांचे दर्शन घेतले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील विविध दत्तमंदिरात आणि तीर्थक्षेत्री दत्तजयंती जन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि भक्तिभावात साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होणारा दत्तजन्म सोहळा यावर्षी करोनामुळे जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीप्रमाणेच पार पडला.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.... या दत्तनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. सातारा शहरातील आनंदवाडी दत्त मंदिर, प्रतापगंज पेठेतील मुतालिक दत्त मंदिर, सातारा शहरातील गेंडामाळ परिसरातील श्री दत्त मंदिर, सज्जनगड येथील समाधी मंदिरापुढील दत्त मंदिर याबरोबरच फलटण, काळज, लोणंद येथील ढाळे कुटुंबीयांचे दत्त मंदिर, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध एस.टी. आगारातील दत्तमंदिरांमध्ये हा जन्मोत्सव सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी साजरा झाला. दत्त जन्मकाळ, महाआरती, पालखी तसेच पारंपारिक लघुरुद्र पठण इ. पारंपारिक शास्त्रोक्त विधी आटोपशीर पद्धतीने पार पाडण्यात आले. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात होता. सातारा जिल्ह्यानजीकच्या नारायणपूर या तीर्थक्षेत्री एकमुखी दत्ताचे दर्शन घेण्यासाठी नागरिक वर्षभर जात असतात. यावर्षी दत्तजयंती उत्सवाला मर्यादा घालून दिल्यामुळे भाविकांनी आपल्या घरीच दत्तजन्म सोहळा साजरा केला.
सातारा शहरातील आनंदवाडी मंदिरात तीन दिवस झालेल्या जयंती सोहळ्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी मंत्रजागर करण्यात आला. जयंतीदिनी सकाळी दत्तयाग होऊन सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दत्त जन्म करण्यात आला. शनिवारी सकाळी लघुरुद्राचे पठण होऊन या जन्मसोहळ्याची सांगता करण्यात आली.


