maharashtra

खटाव तालुक्यातील विसापूर येथे घडले दुहेरी हत्याकांड

वृद्ध पती-पत्नीचा केला अज्ञाताने खून; महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीस

A double murder took place at Visapur in Khatav taluka
तालुक्यातील विसापूर गावात एका 70 वर्षीय हनुमंत भाऊ निकम व कमल हनुमंत निकम वय 65 या पती-पत्नीचा खून झाला असल्याची भयंकर घटना घडल्याने खटाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या दुहेरी हत्याकांडाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

खटाव : तालुक्यातील विसापूर गावात एका 70 वर्षीय हनुमंत भाऊ निकम व कमल हनुमंत निकम वय 65 या पती-पत्नीचा खून झाला असल्याची भयंकर घटना घडल्याने खटाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या दुहेरी हत्याकांडाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून गावचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध पती-पत्नी हनुमंत भाऊ निकम व कमल हनुमंत निकम यांचा खून दोन दिवसापूर्वीच झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घराच्या बाहेर दरवाज्याला कडी होती. घरातून दोन दिवस कोणतीच हालचाल होत नसल्याने शेजारच्या घरातील नागरिकांनी निकम यांच्या घराची कडी उघडली. त्यांना दोन्हीही पती-पत्नीचे मृतदेह निपचित जमिनीवर पडलेले दिसले.
 दोन्ही पती-पत्नीच्या मृतदेहाच्या नाकातोंडातून रक्त येत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कमल हनुमंत निकम यांच्या गळ्यातील दागिने देखील लंपास झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सायंकाळी आठच्या सुमारास गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर गावचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पुसेगाव पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळावर आले. घटनास्थळावरून पंचनामा केला व त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा येथे हलवण्यात आले. या संदर्भात हे दुहेरी हत्याकांड नेमके कोणी व कोणत्या कारणासाठी केले, ही माहिती अद्यापही समोर आली नाही. याबाबत अधिक तपास पुसेगाव पोलीस करत आहेत.