maharashtra

मनाई असताना चक्क कराडच्या प्रीतिसंगम उद्यानात झाली शिक्षकांची प्रचार सभा; यशवंतराव चव्हाण प्रेमी संतप्त


कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ चक्क प्रीतिसंगम उद्यानात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर उद्यानात सतरंज्या अंथरून प्रचार शुभारंभाची सभा देखील घेण्यात आली.

सातारा : कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ चक्क प्रीतिसंगम उद्यानात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर उद्यानात सतरंज्या अंथरून प्रचार शुभारंभाची सभा देखील घेण्यात आली. प्रीतिसंगम उद्यानात राजकीय कार्यक्रमांना मनाई असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कराड नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच यशवंतराव चव्हाण प्रेमींमध्ये तीव्र संताप आहे.
मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या कराड-पाटण शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी दोन पॅनेलमध्ये लढत होत आहे.  गुरूजन एकता पॅनेलमध्ये शिक्षकांच्या दहा संघटना एकवटल्या आहेत. या पॅनेलने ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर प्रीतिसंगम उद्यानातच सभा घेतली. वास्तविक उद्यानात राजकीय अथवा सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई आहे. ही बाब सर्वश्रुत आहे. तरीही सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या शिक्षकांनी आगळीक करून अडाणीपणाचे दर्शन घडवले. प्रीतिसंगमाचा राजकीय आखाडा केल्याने यशवंतप्रेमी संतप्त झाले असून शिक्षकांची प्रचार सभा वादात सापडली आहे.
शिक्षक सोसायटी निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाची सभा प्रीतिसंगम उद्यानात झाल्याची कराड नगरपालिका प्रशासनाला खबरच नाही. वास्तविक उद्यानात दिवस-रात्र नगरपालिकेचे सुरक्षा रक्षक असतात. तरीही राजकीय सभा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उद्यानातील प्रचार सभेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊनही नगरपालिका अनभिज्ञ होती.
या घटनेची माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईत होते. त्यामुळे उप मुख्याधिकारी पल्लवी पवार यांनी माहिती घ्यायला सुरूवात केली. हा प्रकार नगरपालिका प्रशासनाच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभा घेणाऱ्या शिक्षकांवर पालिका प्रशासन काय कारवाई करणार, याकडे कराडकर आणि यशवंतराव चव्हाण प्रेमींचे लक्ष लागून आहे.