maharashtra

शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर 25 एकरावरील द्राक्षबाग नष्ट

अडीच कोटींचे नुकसान; जबाबदारी घेण्यास कंपनीची टाळाटाळ

Destroyed 25 acres of vineyards before the eyes of farmers
कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या औषधाचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दुसरीकडे, कंपनीने नुकसानीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केल्याने दोन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील मालगाव याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कंपनीने पाठवलेल्या चुकीच्या औषधाची फवारणी केल्यामुळे 20 शेतकऱ्यांची तब्बल 25 एकरावरील द्राक्षबाग नष्ट झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांचे तब्बल अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, नुकसानीची जबाबदारी घेण्यास कंपनीने टाळाटाळ केली आहे.
दरम्यान, कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या औषधाचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दुसरीकडे, कंपनीने नुकसानीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केल्याने दोन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील मालगाव येथील काही शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्षबागेवरील रोग नियंत्रण करण्यासाठी गावातील एका कृषी औषध विक्री दुकानातून रोडोमिल 35 टक्के मैटसैक नावाचे औषध खरेदी केले होते.
मालगाव परिसरात वीस शेतकऱ्यांनी संबंधित औषधाची आपल्या द्राक्षेच्या बागेवर फवारणी केली होती. तीन दिवसांत या औषधाची रोगप्रतिबंधक मात्रा लागू होण्याऐवजी द्राक्ष बागेवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. द्राक्ष बागेतील पाने पिवळी पडून द्राक्षेचे घडही गळून पडू लागले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली, पण कंपनीने नुकसानीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केली आहे. याप्रकरणी मालगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.