maharashtra

पाणीटंचाईच्या विरोधात रविवार पेठेतील नागरिक आक्रमक

बिर्याणी शॉप ला बेकायदेशीर कनेक्शन दिल्याचा आरोप

गीते वखार चौक ते सावंत चौक यादरम्यान असणाऱ्या सुमारे 20 सदनिकांना गेल्या पंधरा दिवसापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रविवार पेठेतील हे नागरिक आक्रमक झाले.

सातारा : गीते वखार चौक ते सावंत चौक यादरम्यान असणाऱ्या सुमारे 20 सदनिकांना गेल्या पंधरा दिवसापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रविवार पेठेतील हे नागरिक आक्रमक झाले. सोमवारी त्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन सादर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मल्हार पेठेतील गारवा बिर्याणीला बेकायदेशीर कनेक्शन दिल्यामुळेच आपला पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सर्वे नंबर 66 येथील मूळ पाणी पुरवठा लाईनवरून सावंत चौक ते गीते वखार चौक या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा यशवंत टाकीतून होत आहे. उन्हाळ्यामध्ये यशवंत टाकीला पुरेशा दाबावी लेवल मिळत नाही. त्यामुळे येथे टँकर मागवून पाण्याची गरज भागवावी लागते. असे असताना याच मेन पाईप लाईन मधून 64 मल्हार पेठ पालकर बिल्डिंग येथील गारवा बिर्याणी शॉप ला एक इंची व हॉटेल छोले भटूरे यांना पाऊण इंच नळ कनेक्शन दिल्यानेच गीते वखार पासून वरील भागातील वीस कुटुंबांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेची परवानगी नसताना रात्री दीड वाजता बोअर मारून पाणी उपलब्ध करून घेण्यात आले आहे. पालकर बिल्डींग पासून काही अंतरावर दुसरी पाईपलाईन असताना या दुकानाला गाळ्यापासून दीडशे मीटर अंतरावरील पाईपलाईन मधून पाणी देण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप निवेदनात नमूद आहे.
रविवार पेठेतील संतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.  बेकायदेशीर नळ कनेक्शन तात्काळ बंद करावीत, अशीही मागणी नागरिकांची आहे. यासंदर्भात शहाजी वाठारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गारवा बिर्याणी शॉप ला पाऊण इंची कनेक्शन देण्यात आले आहे. कधी-कधी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांना लेवल मिळत नाही. परिणामी पाणीपुरवठा कमी होतो. या तांत्रिक बाबींची शक्यता तपासून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे वाठारे यांनी स्पष्ट केले.