maharashtra

कास पठारावरील फुलांचा हंगाम उद्यापासून सुरू...!!


जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी तब्बल दहा दिवस उशिरानं सुरू होत आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येणार असून 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचा निर्णय वनसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सातारा : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी तब्बल दहा दिवस उशिरानं सुरू होत आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येणार असून 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचा निर्णय वनसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
चालू वर्षीचा हंगाम हा शनिवार दिनांक 10 सप्टेंबर पासून सुरू करत असल्याची माहिती कास पठार कार्यकारी समिती, तसेच वनविभाग सातारा यांच्याकडून देण्यात आली आहे. कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करण्याबाबतचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हंगामासाठी साधारणपणे 150 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. कास पठाराच्या दोन्ही बाजूला प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्याची शान असलेल्या कास पठाराची सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. येणाऱ्या काही दिवसांत हे कास पठार आता फुलांनी बहरु लागणार असल्यामुळं हा दौरा करण्यात आला. या दौऱ्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, पर्यटनमंत्र्यांचे स्वीय सहाय्य गौतम पठारे, उपप्रादेशीक परिवहन विभागाचे वरिष्ठ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, परिवहन महामंडळाचे अधिकारी इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.