प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना वाळू माफियाकडून धक्काबुक्की
आज महसूल कर्मचार्यांचे एक दिवसीय लेखणीबंद आंदोलन
फलटणमधील अवैध गौण खनिज वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आलेल्या वाळूमाफियाने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या विरोधात महसूल कर्मचार्यांंनी आज दि. 17 रोजी एकदिवसीय लेखणीबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
फलटण : फलटणमधील अवैध गौण खनिज वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आलेल्या वाळूमाफियाने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या विरोधात महसूल कर्मचार्यांंनी आज दि. 17 रोजी एकदिवसीय लेखणीबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, काल दि. 16 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फलटण तालुका गौण खनिज प्रतिबंधक पथकाने एक वाळूचे वाहन आणि अनधिकृतपणे वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एकास ताब्यात घेतले. यानंतर हे वाहन शहर पोलिस स्टेशन येथे जमा करण्यासाठी चालवले असताना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना गिरवीनाका परिसरामध्ये या वाळूमाफियाने धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी प्रांत यांनी त्या वाळूमाफियावर गुन्हा दाखल केलेला आहे.
प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी नोंदविला आहे. त्याचबरोबर अशाप्रकारचे पुन्हा घटना घडू नयेत व भविष्यात शासकीय अधिकारी- कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असताना कोणी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी महसूल कर्मचार्यांनी, तलाठी पोलीस पाटील, कोतवाल, महा ई सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र, सेतू कार्यालय यांनी आज दि.17 रोजी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन केले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शासनास निवेदन सादर करण्यात आले आहे.


