maharashtra

कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर


गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच म्हावशी ता. खंडाळा येथे शुक्रवारी रात्री भरधाव आलेल्या कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. कारचालक मद्य प्राशन करून कार चालवत असल्याचे समोर आले असून त्याला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा : गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच म्हावशी ता. खंडाळा येथे शुक्रवारी रात्री भरधाव आलेल्या कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. कारचालक मद्य प्राशन करून कार चालवत असल्याचे समोर आले असून त्याला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी रात्री साधारण ७.३० च्या सुमारास खंडाळा दिशेने जाणारी स्विफ्ट कार क्र. एमएच ०२ बीआर ४२४६ वरील चालक अनिकेत भरत हेळकर,वय २७, राहणार सोनगीरवाडी वाई याने अहिरे म्हावशी हद्दीतील क्युबिल्ट कंपनीजवळ होंडा स्कूटी क्र. एमएच ११ डीएफ ३३१७ या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये अश्विनी तानाजी धायगुडे (वय ३३), भाग्यश्री सतिश धायगुडे (वय ३०, दोघीही राहणार अहिरे, तालुका-खंडाळा) या गंभीर जखमी झालेल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय सातारा याठिकाणी अधिक उपचार चालू आहेत. यावेळी यांना धडक देऊनही चालक अनिकेत याने न थांबता पलायन केले. मात्र अवघ्या १ किलोमीटरच्या आतच अहिरे दिशेने जाणारी दुचाकी क्र. एमएच ११ सीइ ४६१० यांनाही जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार सुभाष बापूराव धायगुडे (वय ७८) व शिवाजी साहेबराव धायगुडे (वय ६५, दोघेही रा. अहिरे) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी कार चालकाला पकडले असता चालक मद्यधुंद अवस्थेत आढळला.
या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक पांगारे, ए.एस.आय. अहिरराव, पोलिस हवालदार गायकवाड १५५७, जाधव ५६२ हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व या मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले. तसेच जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पांगारे करीत आहेत.