युवतीच्या निर्घृण खूनप्रकरणी एक संशयित चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
खुनाच्या घटनेने कार्वे परिसरासह तालुक्यात खळबळ
कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत ऊसाच्या शेतात डोक्यात दगड घालून युवतीचा (वय अंदाजे २५ वर्षे) निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सोमवारी ३ रोजी सकाळी स्थानिक शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस पाटील व पोलीस पाटलांनी तात्काळ याबाबत कराड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.
कराड : कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत ऊसाच्या शेतात डोक्यात दगड घालून युवतीचा (वय अंदाजे २५ वर्षे) निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सोमवारी ३ रोजी सकाळी स्थानिक शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस पाटील व पोलीस पाटलांनी तात्काळ याबाबत कराड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीत तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी उशिरा एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कार्वे गावच्या हद्दीत कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत भैरोबा मंदिराजवळ सोमवारी सकाळी ऊसाच्या शेतात जाताना शेतकऱ्यांना वाटेवर युवतीचा मृतदेह आढळून आला. याबाबत शेतकऱ्यांनी कार्वे येथील पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी कराड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.
त्यानंतर तात्काळ पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पोलीस कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह, घटनास्थळ व आसपासच्या परिसराची पाहणी केली. यावेळी मृतदेहाजवळ मोठा दगड पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच मृतदेहाच्या चेहऱ्यासह डोक्यात जखमा झाल्याचे दिसून आले. यावरून मृत युवतीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी डॉ. रणजीत पाटील आणि आनंदराव खोबरे यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यादरम्यान, माहिती घेत असतानाच पोलिसांना मृतदेहाजवळ एक पिशवी सापडली. त्यामध्ये एक चिठ्ठी व आधार कार्ड सापडले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू करत काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीवर ‘माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला या व्यक्तीला जबाबदार धरावे’, असे लिहिले आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. मात्र, त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर ती व्यक्ती ही नाही; ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामुळे पोलिसांनी चिठ्ठीचा बनाव असल्याचा अंदाज व्यक्त करून पुन्हा तपासाला गती दिली आहे. त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले.
दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खून झालेल्या संबंधित युवतीचे नाव किंवा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव समजू शकले नाही. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.


