maharashtra

घंटागाडीच्या टेंडरची भाग्यदृष्टी कोणावर?

सोयीस्कर अटी-शर्ती साठी प्रशासकीय काथ्याकूट

Who is the lucky winner of Ghantagadi tender?
सातारा शहराच्या विविध भागांना कचरा संकलनाची सेवा देणाऱ्या घंटागाडीचा निविदेची प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर त्याचे टेंडर कोणाच्या झोळीत पडणार, यामध्ये ठेकेदारांच्या पैजा लागल्या आहेत. मात्र अनेकांचे भाग्य उजळून टाकणाऱ्या ठेकेदारासाठी प्रशासकीय पायघड्या घालण्याचे राजकीय मनसुबे रचले जात आहेत.

सातारा : सातारा शहराच्या विविध भागांना कचरा संकलनाची सेवा देणाऱ्या घंटागाडीचा निविदेची प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर त्याचे टेंडर कोणाच्या झोळीत पडणार, यामध्ये ठेकेदारांच्या पैजा लागल्या आहेत. मात्र अनेकांचे भाग्य उजळून टाकणाऱ्या ठेकेदारासाठी प्रशासकीय पायघड्या घालण्याचे राजकीय मनसुबे रचले जात आहेत.
घंटागाडीचे टेंडर आणि त्याची मुदत तब्बल 21 महिन्यापूर्वीच संपली होती. मात्र कोरोनाच्या आपत्कालीन प्रसंगामुळे प्रशासकीय मंजुरी आणि त्याच्या निविदा इत्यादी गोष्टी प्रचंड लांबणीवर पडल्या. मात्र हे तात्कालिक कारण असले तरी त्या टेंडरच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल हा खरा इथे राजीखुशीचा मामला आहे. यंदाचे टेंडर सहा कोटीचे असून दुसऱ्या टप्प्यामध्ये शौचालय सुविधा आणि कंत्राटी कामगार पुरवणे याकरिता चार कोटीची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे टेंडर मिळवण्यासाठी सातारा पालिकेच्या ठेकेदार मध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र यामध्ये तर राजकीय दबाव टाकून भाग्य उजळणाऱ्या ठेकेदाराला प्रशासकीय आश्रय कसा मिळेल, याचा प्रशासकीय काथ्याकुट गेले काही दिवसांपासून सातारा पालिकेत सुरू आहे. इतक्या मोठ्या टेंडर साठी काम करणारा ठेकेदारही आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. किमान सुरक्षा अनामत म्हणून त्याने दोन कोटी रुपये भरणे अपेक्षित आहे. मात्र येथे अटी व शर्ती यामध्ये सोयीस्कर बदल करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. यामध्ये आरोग्य विभाग नाहक भरडला जात आहे. नको त्या अटी घातल्यामुळे आरोग्य विभागातील एका निरीक्षकाला मुख्याधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे. या टेंडरची खासियत म्हणजे कंत्राटी कामगार कागदावर एक दाखवायचे आणि प्रत्यक्षात वेगळेच कामगार कामाला लावायचे आणि किमान वेतन कायद्यातील निम्मी रक्कम खिशात घालायची. या अपप्रवृत्ती बोकाळलेल्याने पालिकेत दोन वर्षापूर्वी संचित धुमाळ प्रकरण घडले होते. त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती होते की काय, अशी शंका या टेंडरच्या निमित्ताने येऊ लागली आहे. बड्या बड्या ठेकेदारांनी मध्ये हे टेंडर मिळवण्याकरता स्पर्धा सुरू झाली असून सत्ताधारी आघाडीच्या राजकीय वर्तुळातील राजकीय चाणक्य आपापल्या सोयीप्रमाणे या टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप करू लागल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. टेंडरला जिल्हाधिकार्‍यांची प्रशासकीय मान्यता मिळून चौदा दिवस उलटले तरी अद्यापही या टेंडरची प्रसिद्धी झालेली नाही. या विषयावर आरोग्य विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. त्यामुळे नक्की हे टेंडर कोणाच्या गळ्यात पडणार आणि त्यानिमित्ताने कोणाचे भाग्य उजळणार, असा ठेकेदारांच्या वर्तुळात जोरदार प्रश्न विचारला जात आहे. सातारा पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू असल्यामुळे मुख्य अधिकाऱ्यांची मेहेरनजर कोणावर असणार आणि कोणते राजकीय चाणक्य यानिमित्ताने काय सल्ला देणार, या सगळ्या गोष्टींच्या तपशीलामध्ये घंटागाडीची निविदा प्रक्रिया मात्र रखडून पडली आहे.