maharashtra

मोबाइल टॉवरचे कोट्यवधीचे साहित्य चोरीस


खटाव व वर्धनगड परिसरात उघड्यावर पडून असलेले जवळपास एक कोटी रूपयांचे मोबाईल टॉवरचे साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

सातारा : खटाव व वर्धनगड परिसरात उघड्यावर पडून असलेले जवळपास एक कोटी रूपयांचे मोबाईल टॉवरचे साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
याबाबत मोबाईल कंपनीचे प्रतिनिधी पारजी खंडू गव्हाणे (वय 30, रा. वडूज, ता.खटाव) यांनी फिर्याद दिली. दि. 1 एप्रिल 2016 ते 25 मे 2021 या कालावधीत हे साहित्य चोरीला गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खटाव येथे चंद्रकांत भाऊ धुमाळ गट नं. 10 या जमिनीवर पडलेले संपूर्ण मोबाईल टॉवर, निवारा, डिझेल जनरेटर, बॅटरी बॅकअप असे 32 लाख 75 हजार 388 रूपयांचे साहित्य, तर वर्धनगड, ता. खटाव येथील गट नं. 725 या जमिनीवर पडलेले वरील वर्णनाचे 38 लाख 97 हजार 999 रूपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी साईटवरून चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
खटाव येथील चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक येवले व वर्धनगड येथील चोरीचा तपास हवालदार बर्गे करत आहेत.