हॉटेलची तोडफोड करत हर्षल चिकणे याची पत्रकाराला मारहाण
पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; घटनेनंतर संशयित पसार
पोवई नाका, सातारा येथे हॉटेलची तोडफोड करत हर्षल चिकणे (रा. सातारा) याने वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रशांत जगताप यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांना जखमी केले. या घटनेनंतर सातारा जिल्हा पत्रकार संघाने पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा दट्ट्या लावताच पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला.
सातारा : पोवई नाका, सातारा येथे हॉटेलची तोडफोड करत हर्षल चिकणे (रा. सातारा) याने वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रशांत जगताप यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांना जखमी केले. या घटनेनंतर सातारा जिल्हा पत्रकार संघाने पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा दट्ट्या लावताच पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेनंतर संशयित पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी पत्रकार परिषद सुरु असताना हर्षल चिकणे याने जुन्या वादाच्या कारणातून हॉटेलमध्ये धुडगूस घातला. प्रशांत जगताप यांना मारहाण करुन हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. या घटनेनंतर मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार हल्ला विरोधी कृतीचे निमंत्रक सुजीत आंबेकर, डिजीटल मिडीया परिषदेचे अध्यक्ष सनी शिंदे हल्ल्याचा निषेध नोंदवला. हरीष पाटणे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करताच त्यांनी शहर पोलिसांना तशा सूचना दिल्या. दरम्यान, विविध सामाजिक संघटनेच्यावतीनेही या हल्ल्याचा निषेध नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रशांत जगताप हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, एक वर्षापूर्वी संशयित हर्षल चिकणे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याबाबत प्रसिध्दी माध्यमांनी बातम्या प्रसिध्द केल्या होत्या. तसेच रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करत असताना प्रशांत जगताप यांना हर्षल चिकणे यांनी धक्का मारल्याने त्याचा जाब त्यांनी विचारला. या दोन्ही घटनांचा राग मनात धरुन रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चिकणे याने पोवई नाक्यावरील हॉटेलमध्ये येवून पत्रकार परिषद सुरु असताना जगताप यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी हॉटेलमधील टेबल खुर्च्यांचे मोठे नुकसान केले. सुमारे दहा मिनिटे मारहाण व धुडगूस सुरु राहिल्यानंतर संशयित चिकणे याने तेथून पळ काढला. पत्रकरांनी पोलिस ठाण्यात जावून कठोर कारवाईची मागणी केली. त्यानुसार सायंकाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस संशयिताचा शोध घेत असताना त्याने पळ काढल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यावेळी विठ्ठल हेंद्रे, विनित जवळकर, दत्ता यादव, आदेश खताळ, पद्माकर सोळवंडे, प्रतीक भद्रे, साई सावंत, गुरुनाथ जाधव, संतोष पवार, अमोल निकम, प्रमोद इंगळे, प्रकाश शिंदे, महेश क्षिरसागर, वैभव बोडके, किरण मोहिते, प्रकाश वायदंडे, नंदकिशोर निपाणे उपस्थित होते.


