कमिन्स कंपनीतील 1 कोटी 60 लाख रुपयांचा इंजेक्टर चोरीस
2019 मधील घटनेची 2022 मध्ये तक्रार : अनोळखी चोरट्यांवर गुन्हा
सुरवडी, ता. फलटण येथील टाटा कमिन्स कंपनीच्या वेअर हाऊस व असेंम्बली विभागात विविध ठिकाणी ठेवलेले 1 कोटी 60 लाख 57 हजार 35 रुपये किंमतीचे इंधन इंजेक्टर चोरीस गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
फलटण : सुरवडी, ता. फलटण येथील टाटा कमिन्स कंपनीच्या वेअर हाऊस व असेंम्बली विभागात विविध ठिकाणी ठेवलेले 1 कोटी 60 लाख 57 हजार 35 रुपये किंमतीचे इंधन इंजेक्टर चोरीस गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 1 एप्रिल ते 4 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी वरील कालावधीत सुरवडी येथील टाटा कमिन्स प्रा. लि. कंपनीच्या वेअर हा ऊस व असेंम्बली विभागात विविध ठिकाणी ठेवलेले इंधन इंजेक्टर यामध्ये बॉश कंपनीचे एक हजार 31 नग, कमिन्स मॉडेलचे 628 व 586 आणि बॉश कंपनीचे आणखा 325 नग असे एकूण 2 हजार 557 नगर चोरुन नेले आहेत. या साहित्याची एकूण किंमत 1 कोटी 60 लाख 57 हजार 35 रुपये एवढी आहे.
टाटा कमिन्स प्रा. लि. ही जागतिक कंपनी असून सुरवडी येथे कंपनीचा मोठा प्लांट आहे. ही चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यावर कंपनीच्या साहित्य विभागाने मालाची शहनिशा केली. त्यानंतर कंपनीच्या फायनान्स विभागाने स्वतंत्र ऑडिट केल्यानंतर 15 मार्च 2022 रोजी फलटण ग्रामीण पोलीस अज्ञात चोरट्यांविरुध्द तक्रार देण्यात आली आहे. कंपनीचे जनरल मॅनेजर गुरुप्रित भुल्लर यांनी ही तक्रार दिली असून आता पोलिसांसमोर या चोरट्यांचा शोध घेवून कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान उभे आहे.


