राजधानी सातारा नगरीत छत्रपती शिवरायांना अभिवादन
राजघराण्यातील मान्यवरांकडून शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण; शाहूनगरीत शिवकार्यक्रमांचा पारंपारिक उत्साह
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राजधानी साताऱ्यातील माहोल शिवमय झाला. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचा निनाद सुरू होता. सज्जनगड, प्रतापगड, वसंतगड, अजिंक्यतारा, रोहिरेश्वर या किल्ल्यांवरून शिवज्योत नेण्याची लगबग सुरू होती. शाहूनगरीने शिवजयंतीच्या निमित्ताने साक्षात शिवकाल अनुभवला.
सातारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राजधानी साताऱ्यातील माहोल शिवमय झाला. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचा निनाद सुरू होता. सज्जनगड, प्रतापगड, वसंतगड, अजिंक्यतारा, रोहिरेश्वर या किल्ल्यांवरून शिवज्योत नेण्याची लगबग सुरू होती. शाहूनगरीने शिवजयंतीच्या निमित्ताने साक्षात शिवकाल अनुभवला.
शिवजयंतीच्या निमित्ताने सातारा शहरात पालिकेतर्फे पूर्ण तयारी करण्यात आली होती. येथील पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्यात आले होते. विजेच्या माळांनी हा परिसर रात्री उजळून निघाला. सकाळपासूनच राज्यातील विविध ठिकाणचे शिवभक्त अजिंक्यतारा, प्रतापगड, सज्जनगडावर दाखल झाले होते. पोवाड्यांच्या निनादामध्ये शिवज्योती नेल्या जात होत्या. पुरंदर वैराट गड रायरेश्वर येथून आलेल्या शिवज्योतींचे शिवतीर्थावर स्वागत झाले. पीपल्स हॅपी ग्रुपच्या वतीने शिवभक्तांसाठी नाक्यावर अल्पोपहाराची सोय केली होती. शहरातील प्रमुख सार्वजनिक चौकांत शिवप्रतिष्ठापना व देखणी सजावट व ऐतिहासिक देखाव्यांची रेलचेल जाणवली. तालीम संघ मैदान येथील शिवगंध प्रतिष्ठानने छत्रपती शिवरायांची भव्य मूर्ती स्थापन केली होती. राजवाडा येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा भव्य मेघडंबरीवर स्थापण्यात आला होता. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर व एबीसीडी डान्स ग्रुप सातारा यांच्या वतीने शिव जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांनी पोवई नाका येथे शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांची कन्या वृषालीराजे भोसले (पवार), त्यांचे चिरंजीव श्रीमंत कौस्तुभ आदित्य पवार यांनी सुध्दा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यादोगोपाळ पेठ येथे अजिंक्यतारा मित्र समूहाच्या वतीने रक्तदान यज्ञ सोहळा आयोजित केला होता. येथे उभारलेल्या शिवपुतळ्याला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिवादन केले. शुक्रवार पेठेतील तुळजा माता मंदिर परिसरात शहाजीराजे भोसले प्रवेशद्वाराची भव्य प्रतिकृती व देखावा सादर करण्यात आला होता. खा. श्री. छ. उदयनराजे व आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळांना भेटी दिल्या. खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत सायंकाळी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडली.
सातारा शहरातील कमानी हौद परिसराला विजेच्या माळांनी प्रकाशित करण्यात आले होते. या ठिकाणी कारंजे सुरू झाल्याने परिसराला सौंदर्य प्राप्त झाले होते. गोलबाग परिसरातील छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यामागील कारंजेही शिवभक्तांना खुणावत होते. शहरात गल्लोगल्ली शिवमूर्तींचे पूजन करण्यात आले. ज्याप्रमाणे गणेशमूर्ती बसवतात त्याच पद्धतीने चौकाचौकात शिवप्रतिमा ठेवून सभोवती सजावट करण्यात आली होती. सर्वत्र भगवी पताका लावण्यात आल्याने वातावरणात चैतन्य पाहायला मिळाले.
शिवजयंतीनिमित्ताने गेल्या महिन्याभरापासून काही मंडळांनी तयारी केली होती. शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी शिवभक्त मावळय़ांनी तयारी केल्यानुसार सातारा शहरातील शिवतीर्थाला पालिकेच्यावतीने आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यत आली होती. गडावरुन शिवभक्तांनी शिवज्योत आणली जात होती. शहरातील प्रत्येक पेठेत, वॉर्डात शिवजयंती उत्सव मंडळांकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळपासून शिवजयंतीची लगबग प्रत्येक वॉर्डात दिसत होती. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्येही शिवजयंती परवानगी काढून साजरी करण्यात येत होती.
शिवभक्तांकडून किल्ले अजिंक्यतारा येथे शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा
शुक्रवारी रात्री १२ वाजता सातारा शहर व तालुक्यातील शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म सोहळ्याचे, भवानी मातेच्या गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. गडावर शिवछत्रपतींचा जन्मसोहळा उत्साहात पार पडला. दिवसभर किल्ले अजिंक्यतारावरील राजसदरेवरुन शिवज्योत नेण्यासाठी व राजसदरेचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी झाली होती. अनेक महिलांच्या ग्रुपकडून शिवज्योत आणून शिवजयंती साजरी करण्यात आली.
वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते शिवमूर्तीला अभिषेक
शिवजयंतीनिमित्ताने माजी नगराध्यक्ष शिवजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते पोवईनाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शनिवारी सकाळी अभिषेक करण्यात आला. यावेळी विविध ठिकाणांवरून आलेल्या शिवभक्तांनी शिवस्तुतीस्तोत्र पठण केले.
अजिंक्यतारा किल्ल्यावर महिलांसाठी स्वच्छतागृह
सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बाल शिवाजी युवा प्रतिष्ठान आणि सातारा शहरातील सर्व शिवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते, समाजसेववक यांच्या वतीने महिलांसाठी स्वछतागृह बसविण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्यावर महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने महिलांची गैरसोय होत होती, अशी तक्रार प्रसिद्धी माध्यमातून वारंवार होत होती. त्यामुळे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँगेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरबाज शेख यांच्या प्रयत्नाने महिला स्वछतागृह उभारण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमाचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नाजीम इनामदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी नगरसेविका सुजाताराजे महाडिक, नगरसेविका दीपाली राजू गोडसे, प्रशांत आहेरराव, आनंदराव जाधव, निसार शेख, वर्षा देशपांडे, प्रवीण अहिरे, रवींद्र झुटिंग, सुरेश कांबळे, असिफ नगार, सचिन पवार, संतोष डांगे, बापूराव झेंडे उपस्थित होते.


