maharashtra

दहशत माजवण्याचा प्रयत्न आणि चोरी प्रकरणी गुन्हा दाखल


दुकानात घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न आणि चोरी केल्याप्रकरणी सुमारे 35 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : दुकानात घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न आणि चोरी केल्याप्रकरणी सुमारे 35 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 जानेवारी रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास महेश अशोक शिवदास वय 42, रा. पंताचा गोट, सातारा यांच्या वाढे फाटा ता. सातारा येथील तोरणे टायर्स या दुकानामध्ये हणमंत विठ्ठल तोरणे, ललिता हणमंत तोरणे, प्रशांत उर्फ गोट्या हणमंत तोरणे, महेश तोरणे, तेजल तोरणे, हणमंत तोरणे यांची मुलगी, कांतीलाल उर्फ कांता विष्णू कांबळे, हेमाबाई मारुती भवाळ, येडाबाई राजू भवाळ आणि 25 ते 30 अनोळखी व्यक्तींनी अनाधिकाराने दुकानात घुसण्याचा प्रयत्न करून दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरे, दुकानाच्या बाहेर दुकान दुरुस्तीसाठी आणलेले लोखंडे अँगल, पत्रे चोरून नेले. तसेच लहान मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न करून शिवदास यांच्या घरातील जेष्ठ नागरिकांसह सर्व कुटुंबीयांना दोन ते तीन तास नजर कैदेत ठेवून हाताने व लोखंडी अँगलने मारहाण केली व त्या मिळकतीचा ताबा देण्यासाठी भीतीदायक व अपमानास्पद वागणूक करून घरातील महिलांना अश्लील शिवीगाळ करीत त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव केले. याप्रकरणी संबंधितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी तोरणे यांनी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. याबाबत शिवदास यांनी असे म्हटले आहे की, तोरणे यांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱी आणि पत्रकारांची फसवणूक केली आहे. जर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे, तर या गुन्ह्यामध्ये पाच पेक्षा अधिक आरोपी सामील असताना आरोपींवर जबरी चोरीचा गुन्हा पोलिसांनी दाखल करावा, अशीही मागणी शिवदास यांनी केली आहे.