सातारा येथे अजंठा चौक परिसरात उड्डाणपुलाला भगदाड?
रिलायन्सकडून मात्र दावा फेटाळला; नियमित काम असल्याचे स्पष्टीकरण
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा हद्दीत अजंठा चौक परिसरात असणार्या उड्डाण पुलाला भगदाड पडले असल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकू लागल्याने एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षात मात्र या महामार्गाच्या देखभालीचे काम करणार्या रिलायन्स कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावत पावसाळ्याच्या दिवसात नियमितपणे केले जाणारे हे काम असल्याचे सांगितले.
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा हद्दीत अजंठा चौक परिसरात असणार्या उड्डाण पुलाला भगदाड पडले असल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकू लागल्याने एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षात मात्र या महामार्गाच्या देखभालीचे काम करणार्या रिलायन्स कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावत पावसाळ्याच्या दिवसात नियमितपणे केले जाणारे हे काम असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा देशाचा विषय झाला आहे. या मार्गावर सातत्याने पडणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात, सुविधांची वानवा, महिला प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी यांचा अभाव त्यामुळे याविषयी गेल्या पाच वर्षामध्ये अनेक आंदोलने झाली आहेत. सातारा येथील लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून रिलायन्स कंपनीच्या अधिकार्यांची बैठक बोलवली होती. मात्र, त्या बैठकीचे पुढे काय झाले, ते काहीच समजू शकले नाही. आज महामार्गावर अनेक ठिकाणी कामे सुरु असताना सातारा शहर परिसरात असणार्या अजंठा चौक येथील हॉटेल प्रिती समोर असणार्या उड्डाणपुलाला भगदाड पडल्याचे चित्र दिसून येताच वाहनचालकांनी थांबून त्याचे फोटो काढून व्हायरल केल्यामुळे काहीवेळ सातारा शहर परिसरात खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच माध्यम प्रतिनिधींनी घटनास्थळाची पाहणी करुन राष्ट्रीय महामार्गाच्या देखभालीचे काम करणार्या रिलायन्स कंपनीचे अधिकारी संकेत गांधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महामार्गाला भगदाड पडल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी पाणी साठते, त्याठिकाणी जुलै महिन्यामध्ये पॅचअपचे काम हाती घेतले जाते. तेच काम सध्या सुरु आहे. हे काम सुरु असल्यामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली असली तरी वाहनधारकांनी घाबरुन जावू नये, हे काम लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.


