फुकटचं घेतलं, पण महागलं; आता तोंड झालं लॉक!
इन्कमिंग कॉलसाठीही मोजावे लागताहेत 100 रुपये
कोरोनाच्या संकटातून नागरीक सावरत असताना पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. या महागाईच्या झळा जीवनावश्यक बनलेल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीपर्यंत पोहोचल्या आहेत. सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लानच्या दरात मोठी वाढ केल्याने महिनाभराच्या केवळ इन्कमिंग कॉलसाठी 100 रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
पुसेगाव : कोरोनाच्या संकटातून नागरीक सावरत असताना पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. या महागाईच्या झळा जीवनावश्यक बनलेल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीपर्यंत पोहोचल्या आहेत. सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लानच्या दरात मोठी वाढ केल्याने महिनाभराच्या केवळ इन्कमिंग कॉलसाठी 100 रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
एकीकडे सर्व खासगी कंपन्यांनी रिचार्ज दरात सुमारे 20 ते 25 टक्क्यांनी वाढ केली. परंतु कोणीही बोलायला तयार नाही. दुसरीकडे मात्र शेतमालाचे भाव दहा वीस रुपयांनी वाढताच शॉक बसून सर्वांची तोंडे उघडतात. याविषयी सर्वसामान्य जनतेत अंसंतोष पसरला असून समाजमाध्यमांवर सुद्धा रान पेटले आहे. हाताला काम नाही, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत असताना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दररोज भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यात आणखी भरीस भर म्हणजे खाजगी मोबाईल कंपन्यांनी रिचार्जमध्ये केलेली वाढ. सध्या मोबाईल सर्वसामान्यांशी कनेक्ट झालेला आहे. माहिती व दळणवळणाच्या माध्यमांसाठी मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. कोरोना काळात तर याचे महत्व अधिक व्यापक बनले गेले आहे.
खाजगी दुरसंचार कंपन्यांनी नागरिकांना मोफत सिम कार्ड वाटप करून इंटरनेटसह अनलिमिटेड कॉलिंगच्या अनेक सुविधा उपलब्ध करून देत सर्वसामान्यांना मोबाईलची भुरळ घातली. त्यामुळे संपूर्ण जग कवेत आल्याप्रमाणे मोबाईल कंपनीला मोठ्या प्रमाणावर ग्राहक कनेक्ट झाला. परंतू ग्राहक वाढताच नेटवर्क सेवा ढासळली आहे. असे असूनदेखील कंपनीकडून गेल्यावर्षी पासुन सुविधा महाग केल्या आहेत. त्यात गेल्या महिन्यापासुन आणखीनच भर पडली आहे. प्रीपेड कंपनीचे सर्व रिचार्ज वीस ते पंचवीस टक्क्यांनी महाग केले आहेत. फुकट घेतलेलं महागल्याने मोबाईल ग्राहक चांगलेच पस्तावले आहेत.
सोशल मीडियामुळे इंटरनेटचे जाळे गावागावात विणले आहे. त्यात युवकांमध्ये गेल्या सहा ते सात वर्षापासुन सोशल मीडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांना नाममात्र दरात दिली जाणारी सेवा आता महागाईच्या उंबरठ्यावर येऊन ठेवली असल्याने समाजमाध्यमांचा वापर करणार्या युवक - युवतींना याची झळ नक्कीच बसली आहे, बसणार आहे. त्यामुळे या खाजगी दूरसंचार मोबाईल कंपन्यांच्या दरवाढीवर शासनाने अंकुश ठेवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.


