राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्राला प्रथमच सुवर्णपदक
साताऱ्याच्या वाईतील परखंदी हायस्कूलच्या यश शिंदे याच्या उपकरणाचा दिल्लीत गौरव
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात परखंदी (ता वाई) हायस्कूलचा विद्यार्थी यश ज्ञानेश्वर शिंदे व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रसाद यादव यांनी तयार केलेल्या मल्टीपर्पज केटरिंग मशीन या उपकरणाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्राचा प्रथमच गौरव झाला आहे
वाई : राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात परखंदी (ता वाई) हायस्कूलचा विद्यार्थी यश ज्ञानेश्वर शिंदे व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रसाद यादव यांनी तयार केलेल्या मल्टीपर्पज केटरिंग मशीन या उपकरणाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्राचा प्रथमच गौरव झाला आहे
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सुवर्णपदक मिळविल्याबद्दल केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते यश शिंदे याचा दिल्ली येथे गौरव करण्यात आला. सातारा जिल्हा शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचे कौतुक करण्यात आले.संस्था अध्यक्ष रतनसिंह शिंदे,माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर,प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे,तेजस गंबरे, वाईचे गट शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी,विस्तार अधिकारी मंगल मोरे यांनी विद्यालयाचे , विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय उद्यान प्रदर्शन १४ ते १६ सप्टेंबर २०२२ या कालावधीत भरले होते. यामध्ये देशभरातून सुमारे ५५६ विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पाची निवड एनआयएफ या संस्थेद्वारे करण्यात आली होती. या प्रदर्शनात साताऱ्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय (नायगाव ता खंडाळा) सैनिक स्कूल सातारा व परखंदी हायस्कूल (ता वाई) या तीन शाळांच्या उपकरणाची निवड करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ सनदी अधिकारी व एनआयएफ चे तज्ञ मार्गदर्शक यांनी या उपकरणाचे परीक्षण केले. सर्व उपकरणांमधून परखंदी हायस्कूलच्या मल्टीपर्पज केटरिंग मशीन या उपकरणाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले. या उपकरणाने या प्रदर्शनात राज्याला प्रथमच सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
मल्टीपर्पज केटरिंग मशीन बनवण्याचे काम साधारण एक वर्षापासून सुरू होते. राज्यभरातून एकूण २१ उपकरणांची निवड झाली होती. या प्रदर्शनात सुवर्णपदक मिळाल्याने खूप आनंद होत आहे. या उपकरणात आणखीन बदल करून प्रत्यक्ष निर्मितीसाठी एनआयएफ ही केंद्र शासनाची संस्था मदत करायला तयार आहे.
- यश शिंदे, सुवर्णपदक विजेता विद्यार्थी.असे आहे उपकरण...
मल्टीपर्पज केटरिंग मशीन हे केटरिंग व्यवसायाची जेवणाची ताटे मांडणे, जेवणानंतर ते जमा करणे, टेबल स्वच्छ करणे ही अनेक कामे एकाच यंत्राद्वारे करता येतात. यामुळे रोग संक्रमण व इतर स्वच्छतेच्या समस्या उद्भवणार नाहीत. या उपकरणातील पुढील सुधारणा प्रत्यक्ष निर्मितीसाठी एनआयएफ ही केंद्र शासनाची संस्था मदत करणार आहे. पेटंट व निर्मितीसाठी मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहे.


