maharashtra

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी; सुमारे दोन लाखांचा ऐवज लांबवला


Burglary at three different places in the district
जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी 1 लाख 93 हजार 900 रुपयांचा ऐवज लांबवला असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सातारा : जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी 1 लाख 93 हजार 900 रुपयांचा ऐवज लांबवला असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 एप्रिल 2022 ते 23 जुलै दरम्यान नांदोशी तालुका खटाव येथील सुनंदा अविनाश गायकवाड वय 47 यांच्या घराचे सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आज प्रवेश करून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील फ्रिज आणि वॉशिंग मशीन असा सुमारे 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला असल्याची फिर्याद औंध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सी.बी. पाटील करीत आहेत.
दुसर्‍या घटनेत दिनांक 22 जुलै रोजी सकाळी साडेदहा ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर बाजार येथील बापू अभिमान कारंडे वय 36 यांच्या बंद घराच्या दाराचा कडी कोंयंडा तोडून, घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे सात हजार चारशे रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य चोरी केले आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पोलीस नाईक ठोंबरे अधिक तपास करीत आहेत.
तिसर्‍या घटनेत दि. 22 जुलै रोजी दोन ते सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी आप्पाजी लक्ष्मण ढमाळ, वय 63, राहणार अंबरवाडी, तालुका खंडाळा यांच्या बंद घराच्या आडोशाला ठेवलेल्या चावीने घराचे कुलूप उघडून, घरात प्रवेश करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 1 लाख 61 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक एम. के. इंगळे करीत आहेत.